राजकिय

पं.नेहरू – गांधी जयंती सप्ताहाचे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने आयोजन नेहरू, गांधीं विषयी खोटी माहिती तरुण पिढीसमोर मांडण्याचा भाजपचा विकृत प्रयत्न – किरण काळे

अहमदनगर दि. 15 नोव्हेंबर (प्रतिनिधी )
प्रतिनिधी : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री आयर्न लेडी इंदिरा गांधी ही देशाला लाभलेली दोन महान रत्न आहेत. या दोन रत्नांचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान राहिले आहे. त्यांच्या कणखर व दूरदृष्टी नेतृत्वामुळेच भारत आज जगात सक्षम राष्ट्र म्हणून ताठ मानेने उभा असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. जयंती दिनानिमित्त लालटाकी येथील नेहरूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्याही लालटाकी येथील पुतळ्याला यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दशरथ शिंदे, विलास उबाळे, रतिलाल भंडारी, गणेश चव्हाण, अलतमश जरीवाला, गणेश आपरे, उषाताई भगत, आकाश अल्हाट, रियाज सय्यद, चंद्रकांत उजागरे, मुस्तफा खान, शंकर आव्हाड, प्रशांत जाधव, बिभीषण चव्हाण, आकाश आल्हाट, विकास भिंगारदिवे, आनंद जवंजाळ, रोहिदास भालेराव, बाबासाहेब वैरागर, सुधीर लांडगे, सोफियान रंगरेज, समीर शेख, जयराम आखाडे, विनोद दिवटे, अशोक जावळे आदींसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

१४ नोव्हेंबर हा पं.नेहरू यांचा जयंती दिन व बाल दिन म्हणून साजरा केला जातो. तर १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती असते. काँग्रेसच्या या दोन्ही दिवंगत नेत्यांच्या जयंतीचे औचित्य साधून नेहरू, गांधी जयंती सप्ताहाचे आयोजन शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे. यानिमित्ताने या दोन नेत्यांनी राष्ट्रभरणीसाठी केलेल्या कार्याची माहिती काँग्रेस कार्यकर्ते समाजापर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

किरण काळे यावेळी म्हणाले, भाजप हे पं. नेहरू, इंदिरा गांधी यांनी केलेल्या दैदिप्यमान कार्याची माहिती पुसून टाकण्यासाठी सातत्याने खोटी माहिती समाजामध्ये पसरण्याचे काम करत आहे. तरूण पिढीची दिशाभूल यातून केली जात आहे. हा त्यांचा विकृत प्रयत्न आहे. मात्र वास्तव कुणी नाकारू शकत नाही. या दोन्ही नेत्यांच्या कार्याची इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंद झालेली आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची चळवळ हीच काँग्रेसची सर्वात मोठी चळवळ होती. या काळात भाजपचा जन्मही झालेला नव्हता. मात्र इतिहासाची तोडमोड करून तो तरुण पिढीला सांगितला जात आहे. ही मानसिकता विकृतीचे दर्शन घडविणारी आहे. जयंती सप्ताहाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यकर्ते याचा पर्दाफाश करतील.

आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त अभिवादन केल्यानंतर काळे म्हणाले, लहुजी वस्ताद यांनी केलेले कार्य महान आहे. क्रांतिकारकांना घडविणारा वस्ताद म्हणून त्यांची ओळख आहे. ते युद्धकलेत पारंगत होते. पराक्रमी होते. साळवे यांचे सबंध कुटुंब धाडसी होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही त्यांच्या पूर्वजांनी पराक्रम केल्याची इतिहासात नोंद आहे. पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. त्यांच्या उत्तम कामगिरीमुळेच महाराजांनी त्यांना विशेष पदवी दिली होती. आजही लहूजी यांचा जीवनपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन काळे यांनी केले आहे. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला देखील पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे