प्रशासकिय

माझी वसुंधरा’ अभियानात कोपरगांव तालुक्याचे काम कौतुकास्पद- विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे

अभियानातील राज्य शासनाच्या २२ पुरस्कारापैकी १७ पुरस्कार नाशिक विभागाला

*शिर्डी, दि.०७ (प्रतिनिधी) –* ‘ माझी वसुंधरा’ अभियानात कोपरगांव तालुक्यातील काम कौतुकास्पद असे आहे. सांगवीभुसार या गावाने एकजूट दाखवत विक्रमी वृक्षलागवड करत उल्लेखनीय काम केले आहे. असे गौरवोद्गार नाशिक महसूल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी येथे केले.
महाराष्ट्र शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत कोपरगांव पंचायत समितीच्या वतीने सांगवीभुसार या गावात लोकसहभागातून विक्रमी वृक्षलागवड करण्यात आली आहे. या वृक्षलागवडीची पाहणी व उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्षलागवड केल्यानंतर सांगवीभुसार येथे बुधवारी, ६ एप्रिल रोजी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, उप विभागीय अधिकारी गोविंद शिंदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी निखिलकुमार ओस्वाल, तहसीलदार विजय बोरूडे, गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, राहाता तहसीलदार कुंदन हिरे, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, राजेंद्र बापू जाधव आदी उपस्थित होते.

श्री.गमे म्हणाले, माझी वसुंधरा हे पर्यावरण संवर्धन व जतन करण्यासाठी गावांना प्रोत्साहीत करण्यासाठी शासनाने आखलेले हे अभियान आहे. या अभियानात मागील वर्षी राज्यात २२ पुरस्कार देण्यात आले. यापैकी तब्बल १७ पुरस्कार एकट्या नाशिक विभागाने प्राप्त केले. या अभियानाच्या माध्यमातून गावांचा विकास होत आहेत. गावे समृध्द होत आहेत. गावकऱ्यांनी एकजूट ठेवून एकदिलाने काम केल्यास सांगवीभुसार सारखी असंख्य गावे निर्माण होतील.
शेतकऱ्यांच्या सातबारा दुरुस्तीची नाशिक विभागात विक्रमी मोहिम राबविण्यात आली. सातबाऱ्यावरील जूने तगाईचे ७० हजार बोजे कमी करण्यात आले. सामान्य माणसे व शेतकऱ्यांची कामे जलदगतीने झाले पाहिजेत. याकडे प्रशासनाने प्राधान्याने लक्ष दिले असल्याचे श्री.गमे यांनी यावेळी सांगितले.
श्री.राजेंद्र भोसले म्हणाले, माझी वसुंधरा अभियानात भूमी, वायु, जल उर्जा व आकाश या पाच गोंष्टींमध्ये काम करणे अपेक्षित असते. सांगवीभुसार या गावातील तरूण व गावकऱ्यांनी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेत उत्कृष्ट काम केलेले दिसून येत आहे.
श्री.लांगोरे म्हणाले, ‘माझी वसुंधरा’ अभियानात एकूण ५ हजार गुणांचे गुणांकन असते. त्यापैकी सांगवीभुसार गावाने आतापर्यंत ३६०० गुण प्राप्त केले आहेत. गावाने अभियानात केलेल्या कामाबाबत इतर जिल्ह्याना मार्गदर्शन करावे.
यावेळी सांगवीभुसार गावाच्या वतीने विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे व चंद्रपूरचे उप विभागीय पोलीस अधिकारी संजय सांगळे यांचा कोपरगांवचे सुपूत्र म्हणून मानपत्र देऊन विशेष गौरव करण्यात आला.
*हिरवाईने नटलेले सांगवीभुसार *
कोपरगांव तालुक्यातील सांगवीभुसार गावात आपण प्रवेश केल्यानंतर आपणास रस्त्यांच्या दुर्तफा नारळाची झाडे दिसून येतात. गावालगत गोदावरी नदी वाहते. १९७६ मध्ये आलेल्या महापुरामुळे पूर्वीच गाव पुराखाली वाहून गेले. या जून्या गावाचे अवशेष आज ही शिल्लक आहेत. याठिकाणी ‘स्मृतीवन’ नावाने परिसर विकसित करण्यात आला आहे. तेथे तब्बल २ हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. वेगवेगळ्या जातींतील ६००० वृक्षांच्या लागवडीमुळे सांगवीभुसार गावातील आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. कोपरगांव पंचायती समितीच्या सहकार्याने गावकऱ्यांनी गावातील ओसाड जमीनीमध्ये नंदनवन फुलविले आहे. या हिरवाईचे श्रेय गावकऱ्यांना श्रम व परिश्रमाला जाते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे