प्रशासकिय

राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाड्यात सर्व विभागांनी मिशन मोडमध्‍ये काम करावे :पालक सचिव सुमंत भांगे

अहमदनगर दि. 16 (प्रतिनिधी) :- नागरीकांच्‍या विविध विषयांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा जलदगतीने निपटारा होण्‍यासाठी राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता सेवा पंधरवाड्यात जिल्‍ह्यातील सर्व विभागांनी मिशन मोडमध्‍ये काम करावे. अशा सूचना सामान्‍य प्रशासन विभागाचे सचिव तथा जिल्‍ह्याचे पालकसचिव सुमंत भांगे यांनी आज दिल्‍यात. शासनाच्‍या आदेशान्‍वये 17 सप्‍टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 दरम्‍यान राष्‍ट्रनेता ते राष्‍ट्रपिता पंधरवाडा या कार्यक्रमाचे आयोजन संपुर्ण राज्‍यात करण्‍यात आले आहे. या संदर्भात जिल्‍हाधिकारी कार्यालयात दुरदृष्‍यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. भांगे बोलत होते.
या बैठकीला जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्‍हा परिषद मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्‍त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्‍त पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, निवासी उपजिल्‍हाधिकारी पल्‍लवी निर्मळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जयंत कुलकर्णी आदी विभागांचे विभाग प्रमुख जिल्‍हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी दुरदृष्‍यप्रणालीद्वारे उपस्थित होते.
पालक‍सचिव श्री. भांगे पुढे म्‍हणाले, सामान्‍य नागरीकांचे विविध विषयांवरील प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा कालमर्यादेत निपटारा व्‍हावा. या उद्देशाने सेवा पंधरवाडा राबविण्‍याचा निर्णय राज्‍य शासनाने घेतला आहे. या उपक्रमात आपले सरकार, महावितरण, डीबेटी, नागरीसेवा केंद्र, ज्‍या विभागांचे स्‍वतःचे पोर्टल आहे अशा वेब पोर्टलवर 10 सप्‍टेंबर 2022 पर्यंत प्राप्‍त झालेल्‍या तक्रारींचा निपटारा करण्‍यात येणार आहे. यामध्‍ये विविध विभागांच्‍या 14 सेवांचा समावेश आहे. यात महसूल, कृषी, मदत पुनर्वसन, अन्‍न नागरी पुरवठा, ग्रामविकास, नगरविकास, आरोग्‍य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्‍याय या विभागांच्‍या सेवांचा यात समावेश आहे. असे त्‍यांनी सांगितले.
जिल्‍ह्यातील संबंधित विभाग प्रमुखांनी या सेवा नागरीकांना वेळेत देण्‍यासाठी विशेष लक्ष द्यावे. सर्व विभागांच्‍या मदतीने कामकाजाचे सुक्ष्‍म नियोजन करून हा कार्यक्रमयशस्‍वी करावा, असे त्‍यांनी सांगितले. विशेषतः पुरवठा विभाग, आरोग्‍य विभागाने नागरीकांना वेळेत सेवा उपलब्‍ध करून द्याव्‍यात. प्रत्‍येक विभागाने 17 सप्‍टेंबर 2022 ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत कामकाजाचे नियोजन करावे. अशा सुचना त्‍यांनी दिल्‍या. श्री. भांगे यांनी यावेळी कृषी विषयक कामकाज, पर्जन्‍यमान, पीक, शेतक-यांसाठीच्‍या विविध योजना, लंपी रोगाच्‍या नियंत्रणासाठी जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत असलेल्‍या विविध उपाययोजना जिल्‍ह्यातील कायदा सुव्‍यवस्‍था आदी विषयांचा आढावा घेतला.
जिल्‍हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सेवा पंधरवडा कालावधीतील महसूल विभागांच्‍या नियोजनाची माहिती दिली. महानगरपालिका, जिल्‍हा परिषद, आरोग्‍य विभाग, कृषी, महावितरण, नगरपालिका प्रशासन, आदिवासी विकास विभाग, जिल्‍हा पुरवठा विभागाच्‍या विभाग प्रमुखांनी पालक सचिव श्री. भांगे यांना सेवा पंधरवाडा कालावधीतील कामकाजाच्‍या नियोजनाची माहिती दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे