‘घरो घरी तिरंगा’ मोहीमेत माजी सैनिक व कुटुंबीयांनी योगदान द्यावे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांचे आवाहन

अहमदनगर, 4 ऑगस्ट (प्रतिनिधी) – ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’निमित्त शासनाच्या वतीने १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ‘घरो घरी तिरंगा’ अभियान साजरा केले जाणार आहे. या अभियानात माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिक विधवा व त्यांच्या अवलंबून असलेल्या कुटुंबांतील व्यक्तींनी सहभागी होऊन योगदान द्यावे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संदीप विष्णू निचित यांनी केले आहे.
‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनुसार “घरो घरी तिरंगा” तसेच “स्वराज्य महोत्सव” यांचे आयोजन करुन हा उपक्रम देशात यशस्वी करण्यासाठी सूचना दिल्या आहेत. “घरो घरी तिरंगा” हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसार, प्रचार व जाणीव जागृती मोहिमेसाठी सांस्कृतिक कार्य विभागाने जिंगल, गीते, ध्वनीचित्रफित जाहिराती, लघुपट, सेलिब्रिटीच्या माध्यमातून आवाहन व पोस्टरची निर्मिती केली आहे. ती शासनाच्या https://mahaamrut.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
तलाठी, पोस्ट, ग्रामपंचायत, रास्त भाव धान्य दुकाने व महानगर पालिका वॉर्ड कार्यालयांमार्फत नागरिकांना या मोहीमेत सहभागासाठी राष्ट्रध्वज उपलब्ध होणार आहेत. भारतीय ध्वज संहितेचे पालन होणे व जाणते अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये. याची दक्षता घेऊन नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
अहमदनगर जिल्हयातील सर्व माजी सैनिक, युध्द विधवा, माजी सैनिक विधवा तसेच त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबातील सर्व व्यक्ती यांनी ‘घरो घरी तिरंगा’ या उपक्रमात सहभागी होऊन योगदान द्यावे. असे आवाहन ही श्री.संदीप निचित यांनी केले आहे.