प्रधानमंत्री आवास योजनमुळे गोरगरिबांच्या घराची स्वप्नपूर्ती:पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर दि. २१ जानेवारी (प्रतिनिधी,)प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेतून गावागावात घरकुलांच्या निर्मितीचे काम करण्यात येत आहे. सर्वसामान्यांच्या व गोरगरिबांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती योजनेतून
होत असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथे प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी आमदार बबनराव पाचपुते,दिलीप भलसिंग, भगवानराव पाचपुते,विक्रमसिंह पाचपुते, सुवर्णा पाचपुते, प्रतापसिंह पाचपुते,मिलिंद दरेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, केंद्र व राज्य शासनाच्या निधीतून प्रधानमंत्री घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे.वांगदरी येथे आमदार बबनराव पाचपुते यांच्या पुढाकाराने घरकुलांचा पथदर्शी प्रकल्प राबवत दर्जेदार घरकुलांचे निर्मिती करण्यात आली आहे. घरकुलांचा परिसर स्वछ राहील याची काळजी घेण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
२२ जानेवारी हा दिवस देश वासीयांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे.अयोध्या येथे
रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. सर्व गाववासीयांनी या दिवशी उत्सव साजरा करत ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी यावेळी केले.
यावेळी पालकमंत्री श्री विखे पाटील यांच्या हस्ते लाभार्त्याना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुलांच्या चाव्या देण्यात आल्या.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी, ग्रामस्थ तसेच लाभार्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.