नगर शहरातील विकासकामांसाठी किरण काळेंच्या पाठपुराव्यातून रु. २ कोटीच्या निधीला नगर विकास विभागाची मान्यता
महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून शहरासाठी काळेंनी आणला निधी, दर्जेदार कामांसाठी काँग्रेस "आय वॉच" ठेवणार - किरण काळे

अहमदनगर दि.२८ (प्रतिनिधी) : अंतर्गत रस्ते, ओपन स्पेस कंपाउंड वॉल, पेविंग ब्लॉक बसविणे, धार्मिक स्थळांचा विकास, गर्दीच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, समाज मंदिर दुरुस्ती आदी विविध कामांसाठी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या पाठपुराव्यातून राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने रु. २ कोटींच्या निधीला मान्यता दिली आहे. तसा जीआर नगर विकास खात्याच्या वतीने जारी करण्यात आला आहे. महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून किरण काळे यांनी नगर शहरासाठी महाविकास आघाडी सरकारच्यावतीने हा निधी आणला आहे.
‘मनपा क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास’ या योजनेअंतर्गत हा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती काळे यांनी दिली आहे. मनपामध्ये सर्व सत्तेची पदं शिवसेना, राष्ट्रवादीकडे आहेत. काँग्रेसला यामध्ये स्थान मिळालेले नाही. काळे यांच्या नेतृत्वाखालील शहर जिल्हा काँग्रेस ही सातत्याने महापालिकेत विरोधी पक्षाची भूमिका बजावताना नगरकरांना पाहायला मिळत असते. शहराच्या नागरी प्रश्नांवर मनपा प्रशासन, पदाधिकाऱ्यांसह शहराच्या लोकप्रतिनिधींना सतत धारेवर धरणाऱ्या काळे यांनी महसूलमंत्र्यांच्या माध्यमातून थेट निधी मंजूर करून आणल्यामुळे अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
मनपा पदाधिकारी, नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी नसणाऱ्या काळे यांनी केवळ जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून शहरासाठी निधी आणत पुढील वर्षी होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी शहराच्या वेगवेगळ्या प्रभागांमधील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ना.बाळासाहेब थोरातांच्या माध्यमातून बळ देण्यास सुरुवात केल्याचे दिसते आहे. त्यातच काळे यांनी आगामी मनपा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करून टाकले आहे.
मंजूर कामांबाबत अधिक माहिती देताना काळे म्हणाले की, चुकीच्या कामांवर बोट ठेवण्याचे काम काँग्रेस निर्भीडपणे करत असते. मात्र नुसती टीका करून प्रश्न मार्गी लागणार नाहीत. त्यासाठी निधी आणण्यामध्ये देखील काँग्रेस मागे नाही. ना.थोरातांच्या माध्यमातून शहर विकासासाठी काँग्रेस पुढील काळात भरघोस निधी आणेल. मात्र कामे दर्जेदार व्हावीत यासाठी काँग्रेस या मंजूर कामांवर “आय वॉच” ठेवणार आहे. कुणालाही यातील एकही छदाम खाऊ दिला जाणार नाही. त्या-त्या प्रभागांमध्ये काँग्रेस कार्यकर्ते नागरीकांच्या दक्षता गटांसह स्वतः उभे राहून नागरिकांसाठी दर्जेदार कामे करून घेतील, असे काळे यांनी म्हटले आहे.
मंजूर कामांसाठी कार्यान्वयीन यंत्रणा म्हणून मनपाची नेमणूक करण्यात आली आहे. या कामांसाठी ७५ टक्के निधी हा राज्यशासनाचा तर २५ टक्के निधी सहभाग हा मनपाचा असणार आहे. मार्च २०२३ अखेरपर्यंत हा निधी खर्च करण्याचा आदेश शासनाने मनपाला दिला आहे. काँग्रेसने शहरातील रस्त्यांच्या दुरावस्थेवर सातत्याने आवाज उठवला असून मनपावर भव्य आसूड मोर्चा काढला होता. बाजारपेठेत व्यापाऱ्यांच्या रस्ते मागणीवरून सह्यांची मोहीम राबवत चांगलेच धारेवर धरले होते. आता काँग्रेसनेच थेट निधी मंजूर करून आणत किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांची कामे करून घेण्यामध्ये पुढाकार घेतल्याचे पाहायला मिळत आहे.
◾ *मंजूर कामांमधील ठळक बाबी :*
* सावेडीतील प्रोफेसर कॉलनी व भिस्तबाग चौक या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार, या दोन्ही रहदारीच्या चौकांमध्ये यामुळे काही चुकीच्या घटना घडल्यास त्यावर या कॅमेऱ्यांचा २४ तास वॉच राहणार
* हनुमान मंदिर, दत्त मंदिर व गोगादेव मंदिर या धार्मिक स्थळांसाठी निधी मंजुरी
* मुकुंदनगर मधील अंतर्गत कामांसाठी भरघोस निधी
* सावेडी उपनगरासह केडगावसाठी देखील निधी
* नागरिकांना शहराच्या विविध भागांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी २०० बाकड्यांसाठी मंजुरी
◾ *कामाचा तपशील व मंजूर निधी पुढील प्रमाणे :* १. उज्वल हाउसिंग सोसायटी अंतर्गत रस्ते कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. १), २. शिवम कॉलनी अंतर्गत रस्ते कामाची अंदाजित रक्कम रु. २.५ लाख (प्रभाग क्र. १), ३. उज्वल हाउसिंग सोसायटी ओपन स्पेस कंपाउंड वॉल तयार करणे कामाची अंदाजित रक्कम रु. ३ लाख (प्रभाग क्र. १), ४. गणेश कॉलनी अंतर्गत रस्ते कामाची अंदाजित रक्कम रु. ९.५ लाख (प्रभाग क्र. १), ५. अहमदनगर मनपा हद्दीतील सिविल हडको अंतर्गत ओपन स्पेस मध्ये पेविंग ब्लॉक बसविणे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. ५), ६. प्रोफेसर कॉलनी चौक येथे सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. ५), ७. गणेश चौक, सिव्हिल हडको येथील समाज मंदिर दुरुस्ती कामे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. ५), ८. भिस्तबाग चौक येथे सीसीटिव्ही कॅमेरे बसविणे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. १), ९. श्री दत्त मंदिर, मधुराज पार्क, सिमला कॉलनी, सावेडी अहमदनगर येथे समाज मंदिर व वॉल कंपाऊंड करणे कामाची अंदाजित रक्कम रु. १० लाख (प्रभाग क्र. १), १०. भूषण नगर, केडगाव येथील अंतर्गत रस्ते करणे कामाची अंदाजित रक्कम रु. १५ लाख (प्रभाग क्र. १६), ११. रेणुका नगर, केडगाव येथील अंतर्गत रस्ते करणे कामाची अंदाजित रक्कम रु. १० लाख (प्रभाग क्र. १६), १२. राधाकृष्ण कॉलनी परिसर, केडगाव येथील अंतर्गत रस्ते करणे कामाची अंदाजित रक्कम रु. १० लाख (प्रभाग क्र. १६), १३. अहमदनगर महानगर पालिका क्षेत्रांमध्ये विविध ठिकाणी नागरीकांच्या सोयीसाठी विविध सार्वजनिक ठिकाणी बेंचेस (बाकडे) बसविणे, बेंचेसची संख्या – २०० कामाची अंदाजित रक्कम रु. २४ लाख, १४. गोगदेव मंदिर, नालेगांवचे स्लॅबचे काम करणे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख, १५. हनुमान मंदिर, नगर – औरंगाबाद रोड, सावेडीचे वॉल कंपाऊंड बांधणे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. २), १६. हनुमान मंदिर, नगर – औरंगाबाद रोड, सावेडीचे स्लॅबचे काम करणे कामाची अंदाजित रक्कम रु. ५ लाख (प्रभाग क्र. २), १७. मुकुंद नगर परिसर (प्रभाग क्र. ३) अंतर्गत रस्त्यांची कामे करणे अंदाजित रक्कम रु. ४० लाख, १८. सीआयव्ही सोसायटी परीसर (प्रभाग क्र. ३) अंतर्गत रस्त्यांची कामे करणे अंदाजित रक्कम रु. १६ लाख, १९. गोविंदपुरा परिसर (प्रभाग क्र. ३) अंतर्गत रस्त्यांची कामे करणे अंदाजित रक्कम रु. १० लाख, २०. दर्गा दायरा परिसर (प्रभाग क्र. ३) अंतर्गत रस्त्यांची कामे करणे अंदाजित रक्कम रु. १० लाख.