राजकिय

काळेंच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेचे अदृश्य मास्टरमाईंड आ. तांबे – मनोज गुंदेचा, अनिस चुडीवाला

अहमदनगर दि. १३ मार्च (प्रतिनिधी) : नुकत्याच झालेल्या नाशिक पदवीधर निवडणुकीत काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे यांनी पक्षाशी गद्दारी केली. पक्षाचा एबी फॉर्म पळवला आता. तर ते थेट राहुल गांधी यांना अक्कल शिकवू पाहत आहेत. ज्या काँग्रेसने तांबे यांना अनेक मोठ्या संधी दिल्या आज तेच तांबे भाजपच्या पायात लोळण घेत आहेत. त्यांच्या पक्ष विरोधी कामात जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी साथ न देता जाहीररीत्या पक्षनिष्ठा ठेवून महाविकास आघाडीचे काम केले. जयश्रीताई थोरात या जनतेतून आमदार होतील अशी भावना त्यांनी मध्यंतरी जाहीररित्या व्यक्त केली. याचा राग धरून काळेंच्या विरोधात सध्या काँग्रेस पक्षात मागे राहिलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पुढे करत त्यांनी मोहीम उघडली असून तेच या मोहिमेचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला यांनी केला आहे.

किरण काळे हटाव मोहीम काही तथाकथित मंडळींनी शहरात उघडल्याची पत्रकबाजी केली जात आहे. त्यावर गुंदेचा, चुडीवाला यांनी माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की, मुळात पक्ष्याच्या विरोधात जाहीररीत्या पत्रकबाजी करणे हे पक्ष शिस्तीचे उल्लंघन करणारे आहे. पक्षाची प्रतिमा काही लोक पक्षाबाहेरील लोकांचे आदेश ऐकून जाणीवपूर्वक मलिन करत आहेत. काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते आ.बाळासाहेब थोरात यांचे जिल्ह्यातील आणि नगर शहरातील संघटन कमजोर करण्याचा काही मंडळींचा डाव आहे. नुकताच आ. थोरात यांचा शहरात दौरा झाला. पक्षात अनेकांचे प्रवेश झाले.

तांबे यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षातून हकालपट्टीची कारवाई केलेली आहे. काळे जिल्हाध्यक्ष झाल्यापासून शहरात सातत्याने इनकमिंग अव्याहतपणे सुरू आहे. हेच नेमके या लोकांचे दुखणे आहे. शहरातील काँग्रेस ही आक्रमकपणे दहशतीच्या विरोधात लढते. जनसामान्यांसाठी संघर्ष करते. महानगरपालिकेची जोरदार तयारी सध्या सुरू आहे. आ. थोरात, काळे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढल्या जाणार आहेत. मात्र तांबे यांच्या पक्षविरोधी भूमिकेला विरोध केल्याचा राग मनात धरून त्यांनी काँग्रेस पक्षामध्ये काही लोकांना जाणीवपूर्वक ठेवले असून या लोकांनी पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडी उमेदवाराच्या विरोधात जाहीररित्या तांबेंचा प्रचार केला आहे. हे सर्व नगरकारांना माहित असल्याचे गुंदेचा, चुडीवाला यांनी म्हटले आहे.

आ.थोरात यांच्या माध्यमातून काळेंनी शहरासाठी रु. दोन कोटींचा विकास निधी मंजूर करून आणला होता. सुमारे २२ कामे यामध्ये मंजूर करण्यात आली होती l. सत्तापालटानंतर नव्या सरकारने त्याला स्थगिती दिली. तांबेनी पडदामागे राहून कितीही कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला तरी आ. थोरात यांचे शहरातील संघटन कोणत्याही परिस्थितीमध्ये कमजोर होणार नाही, असे गुंदेचा, चुडीवाला यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजेंचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश :
मनोज गुंदेचा म्हणाले की, राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष संजय झिंजे हे लवकरच माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्यावर काळे यांच्या माध्यमातून पक्षाच्या वतीने महत्त्वाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. अजून अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक असून टप्प्याटप्प्याने त्यांचे देखील पक्षप्रवेश लवकरच पार पडतील.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे