राजकिय

काँग्रेस कार्यालयावरील फलकावर माजी मंत्री थोरातांसह स्व.अनिलभैय्या राठोडांचाही फोटो झळकला कार्यालयाला “शिवनेरी” नाव, “अब न्याय होगा” शहर काँग्रेसचे ब्रीदवाक्य

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहर जिल्हा काँग्रेसने यापूर्वी घोषित केल्याप्रमाणे घटस्थापनेपासून चितळे रोडवरील संपर्क कार्यालय नागरिकांसाठी खुले केले आहे. मात्र हे कार्यालय सुरू होताच वेगळ्याच कारणामुळे शहरात चर्चेला उधाण आले नाही. कार्यालय म्हटले की त्यावर फलक आलाच. त्यावर पक्षाच्या नेत्यांचे फोटो आले. मात्र काँग्रेस कार्यालयाच्या फलकावर पक्षाच्या नेत्यांबरोबर चक्क शिवसेनेच्या दिवंगत अनिलभैय्या राठोड यांचा फोटो झळकल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
स्व.राठोड हयात असताना त्यांचे जनसंपर्क कार्यालय असणारे शिवालय अनेकांचा आधार होता. त्यांच्या निधनापासून त्यांच्या नसण्याची उणीव आजही अनेकांना जाणवते. राष्ट्रवादीच्या आमदारांचे याच रस्त्यावर २०१४ पासून कार्यालय सुरू करण्यात आले होते. मात्र कालांतराने ते बंद पडले. आता त्या जागेत जागा मालकाने इतर व्यवसाय सुरू केला आहे. त्यातच शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी लालटाकीच्या कालिका प्राईड येथील शहर काँग्रेसचे कार्यालय बंद करत पक्षाचे व स्वतःचे जनसंपर्क कार्यालय राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या चितळे रोडवर सुरू केले आहे.
कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेल्या नाम फलकावर माजी महसूल मंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आ. बाळासाहेब थोरात व किरण काळे यांचा फोटो आहे. पक्ष चिन्ह आहे. तसेच अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय व किरण गुलाबराव काळे (MBA) जनसंपर्क कार्यालय असे नमूद करण्यात आले आहे. “अब न्याय होगा..!” अशी टॅगलाईन (ब्रीदवाक्य) ठेवण्यात आली आहे. यातून काळे यांना नेमके काय म्हणायचे आहे, यावरून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
मात्र त्याचबरोबर शिवसेनेचे दिवंगत नेते अनिलभैय्या राठोड यांचा देखिल फोटो या फलकावर झळकला आहे. एवढेच नव्हे तर स्व. राठोड यांच्या कार्यालयाचे नाव शिवालय होते. काँग्रेसच्या भर बाजारपेठेत असणाऱ्या कार्यालयाला काळे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. पुढील महिन्यात अधिकृतरित्या उद्घाटनाचा देखील कार्यक्रम आ.थोरात यांच्या उपस्थितीत होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.
स्व.राठोड यांच्या स्मृतिदिनी, गुरू पौर्णिमेला दरवर्षी काळे हे काँग्रेस कार्यकर्त्यांसमवेत शिवालय येथे अभिवादन करण्यासाठी जातात. आयटीपार्क प्रकरणात खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी शिवालय येथे जाऊन अभिवादन करून त्यानंतर पत्रकार परिषदेला संबंधित केले होते. एवढेच नव्हे तर राठोड यांच्या दुःखद निधनानंतर नगर शहरामध्ये श्रद्धांजलीचा सर्वात पहिला फलक काळे यांनीच काँग्रेस पक्षाच्या वतीने दिल्लीगेट येथे लावला होता. काँग्रेस जिल्हाध्यक्ष असले तर देखील काळे यांच्या तोंडी सतत स्व.राठोड यांचे नाव असते. त्यांच्या विचारांवरच आपण चालतो असे ते सातत्याने जाहीररित्या सांगत असतात.
काँग्रेसचे खजिनदार मोहन वाखुरे याबाबत म्हणाले की, यात आश्चर्य वाटावे असे काही नाही. आ.थोरात हे काळे आणि काँगेस कार्यकर्त्यांचे नेते आहेत. थोरात यांच्यावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. स्व.राठोड यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात. नगर शहराला आजही अनिलभैय्या यांच्या विचारांची गरज असल्याने शहरातील गोरगरीब घटकांना न्याय देण्यासाठी आणि शहर विकसित करत असतानाच ते दहशतमुक्त ठेवण्यासाठी अनिलभैय्यांपासून आपल्याला प्रेरणा मिळते असे ते नेहमी आम्हा कार्यकर्त्यांना सांगत असतात. जाहीर भाषणां मधून देखील बोलत असतात.
कार्यालयावरील स्व.भैय्या यांच्या फोटोचे शहरातील सामान्य शिवसैनिकांनी भरभरून स्वागत केले आहे. तशा भावना शिवसैनिक समक्ष भेट घेत, फोन करून व्यक्त करत आहेत. काही लोक तर थांबून स्व. भैय्यांच्या फोटोच्या पाया पडत असल्याचे आम्ही पाहत आहोत. उभी हयात केलेल्या जनसेवेमुळेच आजही नगरकर त्यांच्यावर प्रेम करत असल्याचे वाखुरे यांनी म्हटले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे