शिवसेना नगरसेवक अमोल येवले, विक्रम राठोड धमकी प्रकरण पोलिस यंत्रणेने गांभीर्याने घ्यावे – किरण काळे
शिवसैनिकांना मिळणाऱ्या धमक्या चिंताजनक, काळे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह घेतली येवलेंची भेट

अहमदनगर दि.१७ (प्रतिनिधी): शिवसेना नगरसेवक अमोल येवले, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या ही गंभीर बाब आहे. शिवसैनिकांचे झालेले दुहेरी हत्याकांड महाराष्ट्र अजून विसरलेला नाही. नगर शहरातील राजकारणाची पातळी खालावली आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. पोलीस यंत्रणेने येवले, राठोड यांना आलेल्या धमक्या गांभीर्याने घेत त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे असल्याचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह काळे यांनी नगरसेवक येवले यांची भेट घेत विचारपूस केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, एनएसयुआय जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील उपस्थित होते. काळे यांनी विक्रम राठोड यांच्याशी देखील संपर्क करत त्यांची विचारपूस केली आहे.
काळे यांनी या प्रकरणांबाबत चिंता व्यक्त केली आहे. सध्या शहरामध्ये सामाजिक, राजकीय वातावरण अत्यंत दूषित झाले असल्याचे त्यांनी म्हटले असून रामनवमी मिरवणुकीत धमकी दिल्याची तक्रार राठोड यांनी दिली आहे. विक्रम राठोड यांना मागील दोन-तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये दुसऱ्यांदा धमकी देण्यात आली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून दिवंगत अनिलभैय्या राठोड यांनी आयुष्यभर नगरकरांना दहशतीपासून संरक्षण देण्याचे काम केले हे विसरता येणार नाही. माञ आज शिवसेनेच्या शिवसैनिकांनाच जीवे मारण्याच्या धमक्या येणे ही चिंतेची बाब असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
काळे यांनी म्हटले आहे की, येवले यांच्या बाबतीत झालेला प्रकार पोलिसांनी खोलवर जात विविध अंगाने तपासला पाहिजे. भविष्यातल्या अप्रिय घटनांची ही चाहूल आहे काय ? तसे जर असेल तर त्यापूर्वीच अत्यंत कठोर पावले उचलण्याची गरज आहे. या धमक्या येण्यामागची नेमकी कारणे काय आहेत हे पोलिसांनी शोधून काढले पाहिजे. राजकारणात स्पर्धा ही असतेच. त्यात निश्चितच काही वावगे नाही. मात्र राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण नेतृत्वाच्या जिवाला धोका असल्याचा संदेश वारंवार समाजात जात असेल तर यातून समाजात सुद्धा दहशत निर्माण होताना पाहायला मिळत आहे. ही बाब नगरकरांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी आहे.
काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील या दोन्ही प्रकरणांबाबत निवेदन पाठवत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये शांतता आवश्यक असून राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने आणि खिलाडू वृत्तीने झालं पाहिजे. समाजात काम करणाऱ्या नेतृत्वाच्या, मग ते कोणत्याही पक्षाचे असो, बाबतीत अशा घटना घडणार नाहीत एवढी जरब पोलीस यंत्रणेने निर्माण करावी, असे काळे यांनी म्हटले आहे.