पोलिस अधीक्षक पाटील यांचा कार्यकाळ नगरकरांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांचे प्रतिपादन

अहमदनगर (प्रतिनिधी) – राजकीय व गुन्हेगारीच्यादृष्टीने राज्यात सतत गाजत असलेल्या नगर जिल्ह्यात पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ हा जिल्हावासियांनाही स्मरणात राहील, असे प्रतिपादन स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
मावळते पोलिस अधीक्षक पाटील यांची बदली तसेच लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर प्रॉमिसिंग आयपीएस ऑफिसर हा पुरस्कार मिळाल्याबद्दल स्नेहबंधच्या वतीने सन्मानचिन्ह, शाल देऊन शिंदे यांनी सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी शिल्पकार बालाजी वल्लाल उपस्थित होते.
स्नेहबंधचे अध्यक्ष शिंदे म्हणाले, मावळते पोलिस अधीक्षक पाटील यांनी दोनवर्षांच्या कार्यकाळात ई-टपाल प्रणालीसारखी प्रयोगशीलता व सराईत गुन्हेगारांवर मोक्का कारवाई करून त्यांची जेलची हवा जवळपास कायमस्वरूपी ठेवण्याचे पाटील यांचे कसब प्रभावी अन् चर्चेत राहिले. त्यांचा हा कार्यकाळ नगरकरांना दीर्घकाळ स्मरणात राहील.
लॉकडाऊन काळात शुकशुकाट असलेल्या रस्त्यांवर सहकारी पोलिस कर्मचारी थांबवताना त्यांना कोविडच्या भीतीपासून दूर ठेवण्याचेही कसब दाखवावे लागले. तरीही काही पोलिस बळी गेलेच, पण त्यांच्या परिवारांना मदत मिळवून देण्यातही त्यांनी विशेष पाठपुरावा केला. कोरोनाच्या काळात पाटील यांनी ई-टपाल सेवा अद्ययावत केली. राज्यात सर्वाधिक २१ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई केली, तर सुमारे २३ टोळ्यांना हद्दपार केले. नगर जिल्ह्यात त्यांची कार्यकाळ प्रभावी ठरला. आता नवीन ठिकाणी त्यांच्या हातून चांगले कार्य घडेल, यासाठी शुभेच्छा, असेही शिंदे म्हणाले.
मावळते पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, मी नगरला त्यावेळी मला कोरोना झाला आणि जाता जाताही कोरोना झाला. हा योगायोग होता की बदलीचे संकेत हे मला समजले नाही. तसेच मी महाविद्यालयीन जीवनात दोन वेळा निवडणुकीत पराभूत झालो होतो. मात्र महाराष्ट्रीयन ऑफ द इयर प्रॉमिसिंग आयपीएस ऑफिसर या निवडणुकीत मी विजयी झालो.