नगर दि. 8 मार्च (प्रतिनिधी ): जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजप खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांत सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी दिली जात आहे. कला,मनोरंजन, गायन,संगीत क्षेत्रातील नामवंत सेलिब्रेटींच्या उपस्थितीत होत असल्याने या सर्व कार्यक्रमांना महिलावर्गाची जबरदस्त गर्दी दिसून येत आहे.
अगदी शालेय मुली, कॉलेज युवतींपासून लग्न झालेल्या महिला, मुलं-नातवंड असलेल्या आजीबाईंपर्यंत या रंगारंग कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहे.याबाबत बोलताना फाउंडेशनच्या धनश्री विखे आणि खा.सुजय विखे यांनी सांगितले की, भारतीय समाजात घरामध्ये स्त्री ला निश्चितच मानाचे आणि आदराचे स्थान दिले जाते. अनेक युवती-महिला शिक्षण आणि त्यांच्यातील कलागुण कौशल्याने नोकरी-व्यवसायात स्थिरावत असल्या तरी एकूणच स्त्रीला आजही घरातील सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे सार्वजनिक जीवनात घेता येईल असा मनोरंजन, छंद आदींचा आनंद घेता येत नाही.
घरातील कामांची व्यस्तता आणि समाज काय म्हणेल म्हणून महिलांची व्यक्ती म्हणून घुसमट होत असते. त्यामुळे आम्ही महिला दिनाचे औचित्य साधून सर्व घटकांतील युवती-महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. इतर कोणी मंडळी कार्यक्रम घेताना वेग वेगळे इप्सित डोळ्यासमोर ठेवून कार्यक्रम घेत असतील, मात्र आम्ही जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून कुठलाही राजकीय हेतू डोळ्यासमोर न ठेवता आणि याची उगाच जास्तीची प्रसिद्ध न करता केवळ महिलांच्या मनाचा विचार करून त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण पेरण्याच्या हेतूने कार्यक्रम घेत आहोत. विशेष म्हणजे आम्ही आयोजित केलेल्या कार्यक्रमांना महिला,युवतीं बरोबर अगदी नातू-पणतू असलेल्याआजीबाई देखील आवर्जून उपस्थिती लावत आहेत हे आमच्या कार्यक्रमांचे यश असल्याचे धनश्री विखे म्हणाल्या.शेवगाव, पाथर्डी,कर्जत,जामखेड नंतर राहुरी इथे आयोजित कार्यक्रमास तर रेकॉर्डब्रेक गर्दी झाल्याचे दिसून आले.
असंख्य महिलांची उपस्थिती, प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि दिलखेचक लावणी नृत्यासाठी ओळख निर्माण केलेल्या मानसी नाईक यांचे प्रेक्षकांवर भुरळ घालणारे नृत्य, प्रसिद्ध धम्माल गायक, परीक्षक अवधूत गुप्ते यांचा प्रेक्षकांची मने जिंकणारा आवाज, महिलांसाठी पैठणीसह विविध आकर्षक बक्षिसांची लयलूट आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्तृत्ववान महिलांचा केलेला सन्मान असा अनोखा आणि दैदिप्यमान सोहळा काल राहुरी येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात आणि रेकॉर्ड ब्रेक गर्दीसह संपन्न झाला.जनसेवा फाउंडेशन च्या माध्यमातून काल राहुरी येथील केशर मंगल कार्यालय,(मल्हारवाडी रोड) येथे महिला दिनाच्या अनुषंगाने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा व सांस्कृतिक महोत्सव 2024 चे आयोजन करण्यात आले होते.
माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले आणि धनश्री विखे पाटील यांची सदरील कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महिलांच्या गर्दीने परिसर अगदी फुलून गेला होता. दरम्यान विविध क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देऊन आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांचा सन्मान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा