धाकट्या पंढरीत श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे स्वागत, भक्तिरसात कर्जतकर न्हाऊन निघाले

कर्जत (प्रतिनिधी) : दि २ जुलै
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे धाकटी पंढरी कर्जत शहरात मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पालखी रथाचे प्रमुख हभप मोहन महाराज बेलापुरकर, मानकरी डावरे महाराज आणि पुजेकरी जयंत महाराज गोसावी यांचा सन्मान कर्जतचे ग्रामदैवत श्री संत शिरोमणी सदगुरु गोदड महाराज यात्रा कमिटी, तालुका प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्ञानोबा- माऊली- तुकाराम आणि जय हरीच्या जयघोषणेने शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शहरात ठिकठिकाणी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी रथाचे दर्शन भाविक घेत होते.
गुरुवार, दि ३० रोजी दुपारी दोन वाजता श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे धाकटी पंढरी कर्जत शहरात आगमन झाले. दादा पाटील महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे प्रमुख हभप मोहन महाराज बेलापुरकर यांच्यासह त्यांच्या सोबत असणारे पालखीचे सेवेकरी, मानकरी आणि पुजेकरी यांचा सन्मान कर्जत शहराच्यावतीने करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते. पालखी रथ आणि सोबत असणाऱ्या सर्व दिंडीतील वारकऱ्यांच फटाक्यांची आतिषबाजी, फुलांची उधळण करीत पालखी शहरात दाखल झाली. शहरातील चौकाचौकात पालखीचे दर्शन भाविक घेताना दिसत होते. पालखीतील शिस्तबद्ध वारकरी डोक्यावर तुळस, हातात टाळ, वीणा घेत ज्ञानोबा- माऊली- तुकाराम अशा भक्तीभावात रंगून गेले होते. पालखी मुक्काम असणाऱ्या जिल्हा परिषद मुलांच्या शाळेतील प्रांगणात पालखी पोहचली असता याठिकाणी आरती करण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध सामाजिक संघटनाच्यावतीने जेवणाची पंगत, चहा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना पार्श्वभूमीवरनंतर तब्बल दोन वर्षांनी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमनाने कर्जत शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. जयहरीच्या घोषणेने शहर भक्तिमय रसात न्हाऊन निघाले.
चौकट : श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीला १८७ वर्षांची परंपरा असून या पालखी सोहळ्यात एकूण ४७ दिंड्या आहेत. संताशिवाय समाजाचे परिवर्तन नाही. आज संतांचे सोहळे आणि संतांच्या विचाराची समाजाला गरज आहे. सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर हा पालखी मार्ग सरकारने मार्गी लावावा. यासह पालखी मुक्काम असणाऱ्या ग्रामपंचायतीस अतिरिक्त निधी उपलब्ध करावा तसेच मोबाईल टॉयलेट पालखी सोबत असण्याची मागणी वारकरीसह मोहन महाराज बेलापूरकर यांनी प्रशासनास केली.
२) दोन वर्षांच्या कोरोनानंतर यंदा वारीत मोठा उत्साह – जयंत महाराज गोसावी
आषाढी वारी वारकऱ्यांची परंपरा आहे. मात्र मागील दोन वर्ष कोरोनानंतर विठुरायाच्या भेटीसाठी वारकरी आतुर होता. यंदाच्या वारीत तो उत्साह आणि विठूमाऊलीच्या भेटीची आस वारकऱ्यांमध्ये दिसून येत आहे. ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी रथाचे स्वागत होत आहे. यावर्षी प्रशासन देखील पालखी रथास सहकार्य करीत असून पोलीस विभागाचे विशेष कौतुक करावेसे वाटत असल्याची प्रतिक्रिया जयंत महाराज यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.