टँकर घोटाळ्यातील आरोपींच्या अटकेची मागणी लोकजागृतीचे पोलिसांना निवेदन

पारनेर दि. १४ मे (प्रतिनिधी)पारनेर तालुक्यातील टँकर घोटाळा प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या
शासनाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील
आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे .
पारनेर तालुक्यातील साई सहारा इंफ्रा अँण्ड फॅसिलीटी प्रा लि . या खाजगी
कंपनीच्या सात संचालकांविरोधात गुन्हा दाखल आहे . त्याबाबतचे लेखी निवेदन लोकजागृती सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी
जिल्हा व तालुका पोलिस प्रशासनाला
दिले . टँकर घोटाळ्यात कोट्यावधी रुपयांचा अपहार करणाऱ्या आरोपींचा नुकताच अहमदनगर सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता .
त्यानंतरही आरोपी सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरताना
दिसत आहेत . त्यामुळे पोलिस प्रशासनाने त्यांच्यावर अटकेची कारवाई करावी अशी मागणी लोकजागृतीच्या पदाधिकाऱ्यांनी
निवेदनात केली आहे .
गुन्हा दाखल होवून अडीच महीने
उलटले तरी पोलिस प्रशासन आरोपींना पकडू शकले नाही . त्यामुळे आरोपी सदर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्याची शक्यता आहे . तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दवाब आणत आहेत . त्यामुळे आरोपींना
तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे .
या गुन्ह्यात पोलिसांनी आरोपींविरुद्ध
बनावटगीरीची वाढीव कलमे लावली आहेत . आरोपींविरुद्ध घोटाळ्याचे सबळ पुरावे असल्यामुळेच सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नामंजूर केला आहे . आरोपींनी
पोलिस तपासाला सामोरे जावून
न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम ठेवावा . अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे . याबाबतचे निवेदन पारनेर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय काळे यांना देण्यात आले . यावेळी लोकजागृतीचे बबन कवाद , भानुदास साळवे , शंकर तांबे , अरून रोडे उपस्थित होते .