पूर्वीच्या तुलनेत दंतविकारांचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट मेजर देवदान कळकुंबे यांचे प्रतिपादन, स्नेहबंध व बूथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात मोफत दंतचिकित्सा शिबिर

अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय जीवनातच दंतविकार मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. याकडे वेळीच लक्ष न दिल्यास दंतविकार बळावत जातो. पूर्वीच्या तुलनेत दंतविकारांचे प्रमाण शालेय विद्यार्थ्यांमध्ये दुप्पट ते तिप्पट आढळून येत आहे. योग्य वेळी निदान व्हावे, यासाठी नियमित दंत तपासणी गरजेचे आहे, असे प्रतिपादन इ. बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशन व इ. बूथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने
टिळक रोडवरील जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात दंतचिकित्सा, रक्तदाब व वजन तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे, दंत चिकित्सक डॉ. ममता कांबळे, मुख्याध्यापक विजय आरोटे, सुदाम चौधरी, गणेश वालझाडे, अर्चना देशमुख आदी उपस्थित होते.
दिवसीय मोफत दंत तपासणी शिबिरात ७० विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा, रक्तदाब व वजन करण्यात आले.
डॉ. ममता कांबळे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, अनेक विद्यार्थ्यांना दातांची समस्या असल्याचे आढळून आले. दातांची निगा राखणे बालवयातच शिकल्यास दातांच्या समस्या फार कमी प्रमाणात उद्भवतात. दातांमुळे चेहऱ्याचे सौंदर्य वाढते व त्यासाठी दातांची निगा कशी राखावी? याबाबत डॉ. कांबळे यांनी मार्गदर्शन केले. डॉ. ममता कांबळे यांना विकी पगारे, जॉन वेनॉन, प्रविण साबळे आणि परिचारिका यांनी मदत केली.
दातांचे उत्तम आरोग्य हितकारक
आपले मुख हे आपल्या आरोग्याचे प्रवेशद्वार आहे आणि दातांचे आरोग्य उत्तम असेल, तर चर्वणाबरोबरच सुरू होणारी पचनप्रक्रिया ही आपल्या आरोग्यासाठी हितकारक असते, असे स्नेहबंधचे अध्यक्ष उद्धव शिंदे म्हणाले.