मुकुंदनगर प्रभागातील सादिक शेख यांचा माजी मंत्री आ. थोरातांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर दि. 30 ऑक्टोबर (प्रतिनिधी) : युवा सामाजिक कार्यकर्ते सादिक शेख यांनी राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांसह पक्ष प्रवेश केला आहे. मुकुंद नगर प्रभागातील अनेक समस्या प्रलंबित असून आजवर त्या सुटलेल्या नाहीत. रहिवासी मूलभूत सुविधांपासून आजही वंचित आहेत. मुकुंदनगरचा विकासासाठी आणि सर्व समाजांना बरोबर घेऊन जाण्याचा काँग्रेसचा धर्मनिरपेक्ष विचार यामुळेच आपण प्रवेश केल्याचे यावेळी बोलताना शेख यांनी म्हटले आहे.
संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या अतिथिगृहावर शेख यांचा प्रवेश पार पडला. यावेळी शेख यांच्यासह तमस सय्यद, मोसिन शेख, शहबाज सय्यद, कयूम शेख आदींसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. अल्पसंख्यांक शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिस चूडीवाला यांच्या पुढाकारातून हा प्रवेश झाला. चुडीवाला यावेळी बोलताना म्हणाले, अल्पसंख्यांक मुस्लिम, ख्रिश्चन समाजातील अनेक कार्यकर्ते, युवक काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव हा काँग्रेसचा विचार आहे. आगामी मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संघटनात्मक मजबुतीसाठी अल्पसंख्यांक काँग्रेस काम करत आहे. अनेक मनपा इच्छुक काँग्रेसच्या संपर्कात आहेत. लवकरच त्यांचा टप्प्या टप्प्याने पक्ष प्रवेश घेतला जाणार आहे.
सादिक शेख यावी म्हणाले, किरण काळे यांचे विकासाचे व्हिजन आपल्याला भावले म्हणून कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विशेषतः अल्पसंख्यांक बहुल भागातील विकासाची कामे रखडलेली असून कोणाचेही लक्ष नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्ते, पिण्याचे पाणी, गटारी, स्ट्रीट लाईट यासारखे मूलभूत प्रश्न सोडविण्याची गरज आहे. काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आगामी काळात या संदर्भामध्ये मनपा प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणे, वेळप्रसंगी आंदोलन करणे अशा लोकशाही मार्गाने लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करणार असल्याचे शेख यांनी म्हटले आहे.