कर्जत शहरातील धुळीच्या प्रश्नाकडे प्रशासनाने लक्ष द्यावे – आशिष बोरा

कर्जत (प्रतिनिधी) : दि ३१
कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर यासह अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य आहे. या धुळीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि विशेष करून लहान बालकांना विविध आजारांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे प्रशासनाने धूळ आटोक्यात आणण्यासाठी गांभीर्याने लक्ष देत प्रयत्न करण्याची मागणी सामजिक कार्यकर्ते पत्रकार आशिष बोरा यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
अनेक दिवसांपासून कर्जत शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असल्याने प्रामुख्याने लहान-मोठ्या व्यावसायिकांना त्रास जाणवत आहे. त्यांनी विक्रीसाठी केलेला माल खराब होत त्याची गुणवत्ता ढासळली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देत धूळ अटकाव करण्यासाठी प्रयत्न करावे. या धुळीमुळे सर्वसामान्य नागरिक आणि बालकांना गंभीर आजाराचा धोका देखील उदभवत आहे. शहरात माझी वसुंधरा उपक्रम राबविला जात असून या माध्यमातून स्पर्धेत स्वच्छता, वृक्षारोपन यासह इतर विकासाच्या घटकांवर मोठ्या प्रमाणात सुंदर कामे होत आहे. तसेच कर्जत शहर आणि त्याची रस्ते आगामी काळात धुळमुक्त असणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहत यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी आशिष बोरा यांनी तालुका प्रशासनास निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वी देखील बोरा यांनी धुळीच्या प्रश्नावर आंंदोलन छेडले होते. त्यावेळी तात्पुरत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र धुळीच्या प्रश्नाने पुन्हा डोके वर काढले आहे.