निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्यदक्ष राहून काम करावे: जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले चार तास मॅराथॉन बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला निवडणूक विषयक कामाचा आढावा

अहमदनगर, दि. 5, (प्रतिनिधी) :- विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला प्राधान्य देत या कामामध्ये कुठल्याही प्रकारची दिरंगाई अथवा हलगर्जीपणा न करता कर्तव्यदक्ष राहून काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. चार तास मॅराथॉन बैठक घेत जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी निवडणूक विषयक कामाचा सविस्तर आढावा घेतला.
बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील, सर्व उपजिल्हाधिकारी यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले की, विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतदान केंद्राची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन त्या ठिकाणी कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही, याची खातरजमा करुन घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह आदी सर्व सोई-सुविधा उपलब्ध राहतील, यादृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेशासाठी रॅम्पची उभारणी करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यावेळी दिल्या.
विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचे मतदान ईव्हीएमद्वारे न घेता मतपत्रिकेद्वारे करण्यात येते. त्यामुळे निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही प्रक्रिया समजुन निवडणुकीची प्रक्रिया व कामकाज सुलभरित्या पार पाडण्यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. प्रशिक्षणादरम्यान सर्व बाबींची अत्यंत बारकाईने माहिती देण्यात यावी. अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या काही शंका असतील तर त्यांचे निरसनही तातडीने करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी संबंधितांना दिल्या.
निवडणुकीसाठी आवश्यक असणारे साहित्य, वाहने, पोलीस बंदोबस्त, भरारी पथकांच्या नियुक्त्या यासह इतर आवश्यक सर्व विषयांचा जिल्हाधिकाऱ्यांनी अत्यंत बारकाईने आढावा घेत सर्व अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सुचनांच तंतोतंत पालन करुन त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करत समन्वयाने व जबाबदारीने काम करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिलेत.