जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त विशेष लेख डॉ.सचिन साळवे सायकॉलॉजीस्ट/समुपदेशक

रविवारची निवांत संध्याकाळ होती,बाहेर मुसळधार पाऊस चालू होता.संध्याकाळचे साधारणतः 5 वाजले होते, चहा घेत खिडकीतून पाऊस बघत बसलो होतो.
मोबाईल मध्ये एसएमएस ती रिंग वाजली.आजकाल एसएमएस वर खूप महत्वाचे मेसेज नसतात ,कंपनी किंवा इतर मेसेज असतात म्हणून लगेच काही बघितला नाही.
काही वेळाने मोबाईल हातात घेतल्यावर त्या एसएमएस वर नजर गेली.
अनोळखी नंबर होता ,मेसेज ओपन केला…
*” मला आत्महत्या कराण्याची इच्छा होत आहे आणि मी तसे करायचा विचार करत आहे”*
अचानक आलेल्या अशा मेसेज मुळे थोडे सावध झालो आणि
तात्काळ त्या नंबर वर फोन केला आणि चौकशी केली
समोर साधारणतः एक चाळीशीच्या वयातील पुरुषाचा आवाज होता, त्यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली आणि प्रत्यक्ष भेटूनच बोलुयात म्हणून सुट्टीचा वार असूनही त्यांना कौन्सेलिंग क्लिनिक वर बोलावून घेतले.
माझ्या खिशात तुम्हाला देण्यासाठी पैसे नाहीत,म्हणून त्यांनी आधीच सांगितले होते.
हरकत नाही, आपण आधी बोलुयात ,असे त्यांना सांगितले.
त्यानंतर 15 मिनिटांनी ती व्यक्ती समोर आली.
तो पावसाने भिजलेला होता की अश्रूंनी हे समजत नव्हते..
जसे बाहेर दाटलेले आभाळ तसेच त्याच्या मनातही दाटून आलेले ढग अन डोक्यात विजांचा कडकडाट चालू असणार..आता जगणेच नको,असे वाटणाऱ्याची मनस्थिती अजून काय असणार..
प्रचंड तणावा मध्ये दिसत होता तो ,कौटुंबिक कलह आणि त्यामुळे आयुष्य अगदी उध्वस्त झाल्याप्रमाणे त्याला वाटत होते आणि आता आपल्या आयुष्यात काही शिल्लक राहिलेले नाही म्हणून जीवन संपविलेल बरे अशी त्याची भावना झाली होती.
पण कुठे तरी एक विचार आला आणि आपण कोणाशी तरी बोलावे म्हणून त्यांनी फोन केला.
सेशन झाल्यावर त्याला बरे वाटू लागले आणि त्याने त्याचा निर्णय बदलला.
त्यादिवशी एक आयुष्य वाचले आणि ती व्यक्ती आता चांगले आयुष्य जगत आहेत.
दुसरी ही एक ऐकलेली खरी कहाणी. सुशिक्षित घरातील एक नुकतेच बारावी पास होऊन कॉलेजात जाणारा मुलगा,
दोन भावंडांमध्ये भेदभाव .एक खूप चांगला तर एक खूप नालायक
अशी वागणूक त्या मुलाला मिळत होती
आपण काही कामाचे नाही,लायक नाही असे शब्द वारंवार बाल मनावर आघात करत होते.
ते सहन न झाल्याने नेहमी त्या मुलाच्या मनात आपण मरावे ,जगुन काय करणार म्हणून विचार यायचे.
मध्येच रेल्वे लाईन कडे जायचा,कधी बिल्डिंग च्या टेरेस वर जायचा पण हिंमत नाही झाली.
असेच कॉलेज संपल्यावर मित्रांबरोबर बसले असताना त्याने आपल्या मनात काय चालले हे बोलून दाखविले.
मित्रांनी त्याचे ऐकून घेतले,त्याला समजून घेतले.तो काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तरीही मग मित्रांनी सांगितले की ‘ हे बघ,तुला जे करायचे ते तू योग्य करत नाहीस ,एकदा विचार कर…
आणि हे आयुष्य संपावायचेच असेल तर थोडा विचार कर की तू गेल्यावर लोक किती दिवस रडतील आणि उलट भित्रा म्हणून नावं ठेवतील.
जर तुला आयुष्य नकोच असेल तर
तू तुझे आयुष्य देशासाठी दिले तर ?, सैन्यात भरती हो असे मरण्यापेक्षा देशासाठी मर..’
ती 18,19 वर्षाची मुले त्याचे मित्र त्याला सल्ला देत होती.
त्यावेळी त्या शहरात आर्मी भरती चालू होती.दुसऱ्याच दिवशी हा मुलगा तिथे गेला आणि सर्व जुळून आले आणि तो सैन्यात भरती झाला.
आता ते सैन्यातून निवृत्त झाले आहेत,आज त्यांची मुले मोठी झाली आहेत.
वरील दोन्ही केसेस मध्ये
*ती आलेली वेळ निघून गेली होती आणि ती वेळ निघून जाणे खूप महत्त्वाचे आहे आणि ते शक्य आहे.*
त्यासाठी कोणाकडे तरी मन मोकळे करणे आवश्यक आहे
आणि आपणही आपल्याकडे कोणी तरी त्याची व्यथा सांगत असताना आपण ती ऐकणे ,त्यालां समजावून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे.
अनेक आत्महत्यांचे विचार आणि प्रत्यक्ष आत्महत्या थांबविल्या जावू शकतात.
*” Creating hope through action “*
ही थीम आहे या वर्षी म्हणजे
10 सप्टेंबर 2023,जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन निमित्त
आपल्या आजूबाजूला किंवा अगदी जवळ असे अनेक लोक असतील.
त्यांना ओळखुया आणि सहकार्य करुयात
आत्महत्येची चेतावणी लक्षणे
• स्वतः ला मारण्याबद्दल बोलणे, मरण्याची इच्छा दर्शविणे.
• जगण्याचे कोणतेही कारण नसल्याबद्दल बोलणे,
खूप निराश वाटणे (hopelessness)किंवा रिकामेपणाची भावना असणे (emptiness)
•असह्य भावनिक/ शारीरिक वेदना जाणवणे
• इतरांवर आपण ओझे (burden) असल्याबद्दल बोलणे
• दारू किंवा ड्रग्स अशा व्यसंनाच्या खूप आहारी जाणे
• अतिशय चिंताग्रस्त किंवा खूप बेपर्वाईने वागणे,जोखीम घेणे
• एकटे एकटे रहाणे,स्वतः इतरांपासून दूर रहाणे
• तसेच पूर्वी चा आत्महत्येचा इतिहास असेल किंवा तसा प्रयत्न केला असेल ई.
अशी आणि अजूनही काही लक्षणे असतील तर
त्याला वेळीच हाताळणे गरजेचे आहे.
*Help,Healaing and Hope are always possible*
आत्महत्येचे विचार किंवा कृती हे अत्यंत त्रासात असल्याचे लक्षण आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.
जर ही चेतावणी लक्षणे तुम्हाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला जाणवत असतील तर शक्य तितक्या लवकर मदत मिळावा.
कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र बहुतेक वेळा आत्महत्येची चेतावणी लक्षणे ओळखणारे पहिले असतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीला मानसिक आरोग्य उपचार शोधण्यात मदत करण्याच्या दिशेने पहिले पाऊल उचलू शकतात.
*You are not alone*
जसे शारीरिक आजारासाठी आपण मदत घेतो
तसे मानसिक अस्वस्थता , निराशा किंवा अगदी टोकाचा निर्णय म्हणजेच आत्महत्याचा विचार येणे किंवा तसे करणे या सर्वांसाठी आपण कोणाची तरी मदत घेवू शकतो आणि घ्यायला पाहिजे.
वरील दोन्ही उदाहरणं आपल्या समोर आहेत,ज्यात त्यांनी आपले मनातील अस्वस्थता कोणा समोर तरी मांडली आणि त्यातून बाहेर पडले पण अशी अनेक उदाहरणे आहेत कित्येक लोकं आत्महत्या करून आज या जगातून निघून गेली आहेत.कदाचित त्यांचेही आयुष्य आज वेगळे असते.
आपली भावनिक अवस्था ही काही कायमची नसते त्यामुळे या अस्वस्थ अवस्थे मधून बाहेर येण्यास आपण कोणाची तरी मदत घेवू शकतो.
कुटुंबातील जवळची व्यक्ती,मित्र किंवा या विषयातील तज्ञ यांच्या कडे आपण बोलू शकतो.
सायकियाट्रिस्ट, सायकोलोजीस्ट/समुपदेशक आणि यावर काम करणाऱ्या अनेक संस्था या आपल्याला मदत करू शकतात.
आज अनेक ऑनलाईन मदत करणाऱ्या संस्था पण आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो.
@ मनरंग कौन्सेलिंग सेंटर
अहमदनगर
9822291118
आपले आयुष्य अनमोल आहे,कृपया आपल्या मनाची काळजी घ्या.