आगामी गणेशोत्सव, ईद ए मिलाद सण शांततेत साजरे करावेत-जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ

अहमदनगर, दि.05 स्प्टेंबर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात साजरे होणारे आगामी गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण निर्विघ्नपणे व शांततेत साजरे करावेत असे आवाहन जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शांतता समिती बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख बैठकीस उपस्थित होते.
जिल्हाधिकारी सालीमठ पुढे म्हणाले, गणेश मंडळांनी परिसरात सी सी टीव्ही कॅमेरे लावावेत. गणेश मंडळांच्या विविध परवान्यासाठी, महानगरपालिका कार्यालयात, “एक खिडकी योजना” सुरू करुन या माध्यमातुन गणेश मंडळांना सर्व परवानग्या एकाच ठिकाणी देण्यात याव्यात. या कक्षात संबंधित विभागांचे कर्मचारी नियुक्त करावेत. पालिका प्रशासनातर्फे मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजविण्यात यावे. रस्त्यावर पडलेले बांधकाम साहित्य बाजुला करुन अतिक्रमण निर्मुलन मोहीमेत रस्त्यावरील अतिक्रमण दुर करावेत व मिरवणुकीसाठी रस्ते मोकळे करण्यात यावे. निर्माल्य संकलनाची व्यवस्था करावी. कृत्रिम तलाव करावेत.
या उत्सवाच्या काळात महानगरपालिकेत कंट्रोल रुम सुरू करण्यात यावा. या काळात नागरीकांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनातर्फे घेतली जाईल. जिल्ह्यातुन तसेच शहरी भागातुन उत्कृष्ट गणेश मंडळांना प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक देऊन गौरविण्यात येईल. नागरीकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद सण शांततेत पार पाडावेत. असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्री. ओला यांनी शांतता समितीकडून आलेल्या सुचनांची दखल घेण्यात येऊन त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात येईल असे सांगितले. डी जे मुळे होणा-या ध्वनी प्रदुषणाच्या नियमांचे मंडळांनी पालन करावेत. लाईट गेल्यावर मंडळाने जनरेटरची व्यवस्था ठेवावी. मिरवणूकी दरम्यान मंडळाने शिस्त पाळावी. आदी विषयांवर चर्चा केली.
या बैठकीत शांतता समितीचे सदस्य आणि गणेश मंडळांचे सदस्य यांनी काही उपयुक्त सुचना केल्या.