लोककल्याणकारी योजनांचा संदेश घेऊन* *महाराष्ट्र एक्सप्रेस* *अहमदनगर मधून मार्गस्थ
विकासकामांची माहिती डब्यावर

अहमदनगर ( प्रतिनिधी) दि. 9 -माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सरकारच्या विविध विकास कामांवर तयार करण्यात आलेल्या लोककल्याणाचा संदेश घेऊन ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ नूकतीच अहमदनगर येथून गोदिंयाकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने नुकतेच दोन वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केले असून सरकारने घेतलेल्या लोक कल्याणकारी निर्णयाचे व लोकोपयोगी योजनांचा संदेश रेल्वेच्या डब्यावर अंकित केला आहे. यासाठी राज्यात पाच एक्सप्रेस गाड्यांची निवड करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या लोकहिताच्या योजना सर्वसामान्य नागरिक व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. यावर्षी प्रथमच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा वापर करण्यात आला आहे. यात कोल्हापूर-गोंदिया मार्गावर धावणाऱ्या ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ या गाडीची संदेशासाठी निवड करण्यात आली आहे.
‘आपला महाराष्ट्र, आपले सरकार’ ही टॅग लाईन घेऊन विविध लोकोपयोगी योजनांचा अतिशय समर्पक संदेश रेल्वे गाड्यांच्या डब्यावर अंकित करण्यात आला आहे. शेती, क्रीडा, सामाजिक न्याय, आरोग्य, मोफत सातबारा, ई-पीक पाहणी, लसीकरण, चिंतामुक्त शेतकरी यासह विविध योजनांचा यात समावेश आहे. दोन वर्षात सरकारने विविध विकास कामे केली आहेत, त्याची माहिती ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ वर प्रदर्शित करण्यात आली आहे. ‘दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची’ हा संदेश घेऊन ही रेल्वे धावत आहे.
समृद्ध शेतीसाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे उभे असून, गतवर्षी चक्रीवादळबाधित फळबागांसाठी पुर्नलागवड व पुनरुज्जीवन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. यासोबतच कोरोना महामारीमध्ये पालक गमावलेल्या बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी पाच लाखाची मुदत ठेव योजना सुरु करण्यात आली असल्याचा संदेशही देण्यात आला आहे. ‘चिंतामुक्त शेतकरी’, ‘मोफत सातबारा’, ‘ई-पीक पाहणी’ नोंदणी, पुण्यातील ‘सारथी’ संस्थेबद्दल माहिती देण्यातसोबतच ‘माझी वसुंधरा’ आणि संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेत पुरस्कार मिळविणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य याबाबतची माहिती ही या एक्सप्रेसवर देण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या विविध विकासकामांची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याचा हेतूने निघालेली महाराष्ट्र एक्स्प्रेस 8 फेब्रुवारी रोजी पहाटे 2 वाजता अहमदनगर रेल्वे स्टेशनवरून गोदिंयाकडे मार्गस्थ झाली.