प्रशासकिय

लम्पी ’नियंत्रणासाठी ५५२ गावांमध्ये ३ लाख पशुधनाचे लसीकरण – ज‍िल्हाध‍िकारी डॉ.राजेंद्र भोसले. पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प; घाबरू नये जिल्हाधिकाऱ्यांचे पशुपालकांना आवाहन

लम्पी नियंत्रणासाठी प्रशासन तत्पर, पशुपालकांच्या पाठीशी शासन खंबीर

अहमदनगर, दि.१६ सप्टेंबर (प्रतिनिधी)- पशुधनावरील ‘लम्पी’ चर्मरोग हद्दपार करण्यासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासन तत्पर असून जिल्ह्यातील ५५२ गावातील ३ लाख पशुंचे यशस्वीपणे लसीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात ४७८ जनावरे बाधित आहेत. त्यापैकी २१७ जनावरे बरी झालेली आहेत. शासन शेतकरी व पशुपालकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. पशुंचा लम्पी रोगाने मृत्यु झाल्यास पशुपालकांना जिल्हा नियोजन निधीमधून नुकसान भरपाई ही देण्यात येणार आहे. ‘लम्पी’ चर्म रोग हा पशुंमध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी तो तत्पर उपचार सुरू केल्यास निश्चितपणे बरा होतो. या रोगाने पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी आज येथे केले.

लम्पी रोगा संदर्भात पशुसंवर्धन, दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जगदीश गुप्ता, आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आज संवाद साधला. या ऑनलाईन बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अहमदनगर जिल्ह्यात लम्पी रोगाच्या प्रतिबंधासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.भोसले बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. सुनिल तुमरे उपस्थित होते.

या रोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढू नये, पशुसंवर्धन विभागाने शंभर टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे नियोजन करावे, शेतकऱ्यांमध्ये व लोकांमध्ये या रोगाबाबत कुठलाही संभ्रम निर्माण होणार नाही. यासंदर्भात दक्षता घ्यावी. रोगाची योग्य माहिती पशुपालकांपर्यंत पोहचविण्यात यावी. अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ.भोसले म्हणाले की, जिल्ह्यात यापूर्वीही २०२०-२१ मध्ये 32 गावांमध्ये व २०२१-२२ मध्ये २७ गावात लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आलेला होता. मात्र यामध्ये एकाही पशुधनाचा मृत्यु झाला नव्हता. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. पशुपालकांनी त्यांच्या बाधित पशुधनासाठी मोफत उपचार घ्यावेत. खासगी वा शासकीय पशुवैद्यकांनी या साथीच्या उपचारासाठी शुल्क आकारणी केल्यास किंवा याबाबत काही तक्रार असल्यास, विभागाच्या जिल्हा उपआयुक्त किंवा पशुसंवर्धन विभागाचा टोल फ्री क्र. १८००-२३३०-४१८ अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र.१९६२ येथे तात्काळ संपर्क साधावा.

‘लम्पी’रोगाने पशुचा मृत्यु झाल्यास पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय १२ सप्टेंबर २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. आवश्यक लस, औषधी, साधनसामुग्री अशा विविध बाबींवरील खर्चासाठी जिल्हा नियोजन समित्यांनी २०२२-२३ मधील उपलब्ध निधीतून १ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. अशी माहिती ही जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी यावेळी दिली.

संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम, २००९ मधील कलम ४ (१) नुसार पशुंमध्ये या रोगाची लक्षणे आढळून आल्यास प्रत्येक व्यक्ती, अशासकीय संस्था, संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी सदरची माहिती नजिकच्या पशुवैद्यकीय संस्थेस कळविणे बंधनकारक आहे. ‘लम्पी’ चर्म रोगाची लक्षणे दिसल्यास, जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने / पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती देऊन उपचार करून घ्यावे. असे आवाहन ही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे