किरण काळेंची उड्डाणपूल 2.0 – न्यू आर्टस् ते सक्कर चौक आणि 3.0 – जाधव पेट्रोलपंप ते नेप्ती चौक करण्याची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. गडकरींकडे मागणी पत्रकार परिषदेत सादर केला उड्डाणपुलाचा नियोजित आराखडा

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर शहरातील पहिल्या – वहिल्या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची सध्या मोठी लगबग सुरू आहे. या निमित्ताने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी १९ नोव्हेंबर रोजी नगर शहर दौऱ्यावर येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषद घेत उड्डाणपूल 2.0 आणि 3.0 करण्याची मागणी ना. गडकरी यांच्याकडे पत्र पाठवत केली असून दोन्ही उड्डाणपूलांचा नियोजित आराखडा देखील सादर केला आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांच्या प्रश्नावरून नुकताच मुंबईत उपोषणाचा इशारा देणाऱ्या काळे यांनी आता दोन नवीन उड्डाणपूलांची मागणी केल्यामुळे गडकरी यांचा दौरा होण्यापूर्वीच शहरातील वातावरण माञ ढवळून निघत आहे.*
याबाबत माहिती देताना काळे म्हणाले की, शहरातील वाहतूक समस्या पाहता आणि शहरातील स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेता (सक्कर चौक ते अशोका हॉटेल या उड्डाणपूलाला 1.0 असे संबोधले आहे) शहरासाठीच्या उड्डाणपूल 2.0 आणि 3.0 ची तातडीने उभारणीचे काम हाती घेणे आवश्यक आहे, असे माझे मत आहे. या दोन्ही उड्डाणपूलांचा नियोजित आराखडा आम्ही तयार केला असून तो ना. गडकरी यांना पाठविला आहे. उड्डाणपूल 2.0 हा सुमारे २.७ किलोमीटर अंतराचा न्यू आर्ट्स कॉलेज ते सक्कर चौक असा करण्याची आमची मागणी आहे. या मार्गावरच्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे शहरातील स्थानिक नागरिकांना नेहमीच मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते. न्यू आर्ट्स कॉलेज आणि रेसिडेन्सीअल शाळा या ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत असते. शाळा, कॉलेज भरण्याच्या, सुटण्याच्या वेळेला या ठिकाणी दररोज ट्रॅफिक जाम होते. निलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती चौक या दरम्यान सतत वाहतूक कोंडी होत असते.
नालेगावातील अमरधाम या ठिकाणी अंत्यविधी, दशक्रिया विधीसाठी दररोज सकाळच्या वेळेला आणि दिवसात इतर वेळा देखील मोठी गर्दी होत असते. यामुळे देखील दुतर्फा वाहनांच्या रांगा कायम लागलेल्या पाहायला मिळतात. बेग पटांगणामध्ये भाजी बाजार भरतो. या ठिकाणी देखील सातत्याने गर्दी होत असते. परिणामी अनेक वेळेला सिद्धी बागेपासून ते थेट आयुर्वेद कॉलेजपर्यंत शहरातील स्थानिक नागरिकांना जवळपास प्रत्येक दिवशी ट्राफिक जामचा सामना करावा लागतो. तेव्हा ही परिस्थिती लक्षात घेता न्यू आर्ट्स कॉलेज ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपूल 2.0 होणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. हा उड्डाणपूल आत्ताच्या सक्कर चौक ते अशोका हॉटेल पर्यंतच्या उड्डाणपुलाला औरंगाबाद रोडकडे जाऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी जोडला जाण्याची गरज आहे. तर दुसरीकडे पुण्याकडे जाणाऱ्या लोकांसाठी त्यांना वेगळा मार्ग यातून करून देणे आवश्यक असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
काळे पुढे म्हणाले की, दुसऱ्या बाजूला नगर कल्याण रोडवर सीना नदीच्या पलीकडे शिवाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये नगर शहराचा नव्याने अलीकडच्या काही वर्षांमध्ये विस्तार झाला आहे. मोठी लोकसंख्या त्या ठिकाणी वास्तव्यास आहे. सीना नदीला वारंवार येणाऱ्या पूलामुळे जुना पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे या भागातील नागरिकांचा शहराशी पूर्ण संपर्क तुटतो. त्यामुळे सुमारे १.२ किलोमीटर अंतराचा जाधव पेट्रोल पंप ते नेप्ती नाका चौकापर्यंत उड्डाणपूल 3.0 करावा अशी आमची मागणी आहे. तो करत असताना जुन्या नदी फुलाची देखील उंची पूर्वीपेक्षा वाढविणे आवश्यक आहे. अनेक वेळा नेप्ती नाका ते पुलाच्या दुतर्फा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. आजच ही परिस्थिती आहे. तर पुढील दहा वर्षानंतर दोन्ही मार्गांवर ही परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेलेली पाहायला मिळणार आहे.
खरे तर या दोन्ही उड्डाणपुलांची यापूर्वीच उभारणी व्हायला हवी होती. मात्र दुर्दैवाने कोणत्याही लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे लक्ष दिले नाही. मात्र आज रोजीची असणारी गरज आणि भविष्यातील याही पेक्षा मोठी उद्भवणारी वाहतुक समस्या लक्षात घेता तात्काळ उड्डाणपूल 2.0 व 3.0 चा प्रस्ताव आवश्यक त्या निधीच्या तरतुदीसह मंजूर करण्याबाबत मी ना. गडकरींकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने मागणी केली आहे. डॉ.सुजय विखे यांनी देखील या विषयात नगर दक्षिणचे खासदार या नात्याने लक्ष घालावे. त्यांना देखील या बाबतचा प्रस्ताव मी ईमेलद्वारे पाठविला आहे. १८ व १९ नोव्हेंबर रोजी खा. राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नगर शहरातील कार्यकर्ते व आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्यात सहभागी होण्यासाठी जाणार आहोत.
त्यामुळे गडकरी यांची समक्ष भेट घेणे शक्य नसल्यामुळे त्यांना ते नगरमध्ये येण्यापूर्वीच आम्ही नियोजित आराखडा आणि आवश्यक तपशिल त्यांना नगरकरांच्या वतीने मागणी करत पाठविला आहे. मला आशा आहे की, ते शहरासाठी या प्रस्ताबाबत सकारात्मकता दर्शवतील. या विभागाचे खासदार देखील काँग्रेसच्या या मागणीचा पाठपुरावा त्यांच्या पक्षाच्या असणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांकडे करतील, असा आशावाद काळे यांनी पत्रकार परिषद बोलताना व्यक्त केला आहेत
*श्रेय वादात मला पडायचे नाही :*
ज्याने जे केले आहे, त्याला त्याचे श्रेय मिळाले पाहिजे. स्व. अनिलभैय्या राठोड यांना पहिल्या उड्डाणपुलासाठी केलेल्या पाठपुराव्यासाठीचे श्रेय मोठ्या मनाने द्यायला हवे होते. पण कोणाला श्रेय घ्यायचे त्यांनी ते घ्यावे. श्रेय वादात मला पडायचे नाही. मला फक्त नगर शहराचा शतप्रतिशत विकास हवा आहे. जनतेच्या पैशातून झालेल्या विकास कामांचे श्रेय घेत असताना नगर शहरातील आज रोजी असणाऱ्या हजारो खड्ड्यांचे श्रेय देखील घेण्यासाठी शहराच्या आमदारांनी पुढे यायला हवे. मात्र त्यांनी दुर्दैवाने डोळ्यावर मोठी पट्टी बांधली आहे. शहरातील अंतर्गत रस्ते होत नाहीत तोपर्यंत मी अजिबात शांत बसणार नाही. वेळप्रसंगी माझ्या नगरकरांसाठी मी मुंबईत जाऊन उपोषण करेल. मात्र सत्ताधाऱ्यांना शहरातील रस्ते करायला भागच पाडेल, असा टोला देखील काळे यांनी यावेळी आमदारांचे नाव न घेता लगावला आहे.
…याचा नागरिकांना अधिक फायदा होईल, काळेंचा दावा :
सक्कर चौक ते अशोका हॉटेल उड्डाणपुलाचे काम पूर्ण होत आहे. आम्ही काँग्रेसच्या वतीने निश्चितच याचे स्वागत करतो. आम्ही प्रस्तावित केलेले उड्डाणपूल 2.0 व 3.0 हे नगर शहरातील स्थानिक नागरिकांसाठी, त्यांच्या दैनंदिन दळणवळणासाठी मैलाचा दगड ठरू शकतील. याचा स्थानिक नागरिकांना अधिक फायदा होईल, असा दावा काळे यांनी केला असून हे दोन्ही पूल विक्रमी वेळात मंजुर करत पूर्ण करण्याचे काम संबंधितांनी करावे, अशी मागणी केली आहे.