पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश!

अहमदनगर (प्रतिनिधी) अहमदनगर जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश शनिवारी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना दिले आहेत.
नगर जिल्ह्याचे यापूर्वीचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची बदली झाली. त्यांच्या जागी नागपूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकताच पदभार घेतला. दरम्यान, शनिवारी (दि. २९) पार पडलेल्या गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातल्या सर्व पोलीस अधिकार्यांशी सुसंवाद साधला.
यापूर्वीचे एसपी पाटील यांनी ‘टूप्लस’ आणि ई टपाल या पटर्नमधून नगर जिल्हा पोलीस प्रतिमा राज्यात उंचाविली. उत्कृष्ट कामगिरीमुळे एसपी पाटील यांचा राज्यपालांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला होता.
एसपी पाटील यांच्या ‘टू प्लस’ पॅटर्नमुळे गुन्हेगारांना पळता भुई थोडी झाली होती. अनेक गुन्हेगारांविरुध्द एसपी पाटील यांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. परिणामी नगर जिल्ह्यातल्या गुन्हेगारीचा आलेख खूप खाली आला. एसपी आॅफिसमध्ये कामानिमित्त येणार्या सामान्य नागरिकांची कामे मार्गी लावताना एसपी पाटील हे संबंधित अधिकार्याला नागरिकांसमोरच योग्य त्या सूचना द्यायचे. प्रत्येक नागरिकांची कामे मार्गी लावणं आणि सह्यांसाठी समोर फाईलींचा कितीही मोठा ढिगारा असला तरी प्रत्येक फाईल्सचा निपटारा झाल्याशिवाय घरी न जाण्याचा शिरस्ता एसपी पाटील यांनी कायम ठेवला.
नुकतेच एसपी पदाचा पदभार घेतलेल्या राकेश ओला यांनी (दि. २९) गुन्हे आढावा बैठकीत नगर जिल्ह्यातल्या सर्व पोलीस अधिकार्यांशी सुसंवाद साधला. काम करत असताना काय अडचणी येतात, त्या अडचणी कशा सोडवता, तक्रारी घेऊन येणार्या नागरिकांना दिलासा मिळावा, त्या नागरिकांचं समाधान व्हावं, यासाठी काय करता, अशा विविध प्रश्नांद्वारे एसपी ओला यांनी बैठकीला उपस्थित अधिकार्यांचं माईंड सेट केलं.
दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरु झालेली क्राईम मिटींग सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. या गुन्हे आढावा बैठकीत उपस्थित अधिकार्यांना संबोधित करताना नगर जिल्ह्यातल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करा, कोणाचाही मुलाहिजा बाळगू नका. अवैध धंद्यांच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या ‘गब्बर’ झालेल्यांकडून सामान्य जनतेला खूप त्रास होतो आहे. त्यामुळे कोणालाच पाठीशी घालू नका, असे स्पष्ट आदेश एसपी ओला यांनी सर्वच अधिकार्यांना दिले.