काँग्रेसच्या भकासपर्व पुस्तकाच्या मुखपृष्ठावरील रस्ता दुरावस्थेच्या छायाचित्रानंतर तातडीने कामाला सुरूवात प्रकाशनापूर्वीच नगरकरांना काँग्रेसचा रिझल्ट – किरण काळेंचा दावा

अहमदनगर दि.२५ जून (प्रतिनिधी ): शहरातील तथाकथित विकासपर्ववर हल्लाबोल करणाऱ्या काँग्रेसच्या भकासपर्व पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सावेडीच्या रेणाविकर शाळेसमोरील रस्त्याच्या दुरावस्थेचे छायाचित्र प्रसिद्ध झाले होते. हे छायाचित्र शहरातील रस्त्यांचे वास्तव दर्शविणारे एक प्रातिनिधिक छायाचित्र होते. मात्र मुखपृष्ठावर ते समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताच रस्त्याच्या कामाला तातडीने सुरुवात झाली असून लवकरच आता हा रस्ता पूर्ण होणार आहे. काँग्रेसच्या पुस्तक प्रकाशनपूर्वीच नगरकरांना काँग्रेस मुळेच हा रिझल्ट मिळाल्याचा दावा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
काळे म्हणाले की, सदर काम हे अर्धवट स्थितीत सोडण्यात आले होते. शहरात अनेक ठिकाणी अशा पद्धतीने कामे आजही अर्धवट स्थितीमध्ये आहेत. या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नुकत्याच शाळा सुरू झाल्या असून पाऊस देखील सुरू झाला आहे. यामुळे शाळेमध्ये येणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक तसेच या रस्त्याने मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा सुरू असते. त्यांची गैरसोय होत होती. कधीकधी खड्डे, त्यात साचलेले पाणी यामुळे अपघात देखील या रस्त्यावर होत असतात. यामुळे शाळेत येणाऱ्या लहान मुलांच्या व नागरीकांच्या सुरक्षिततेला देखील धोका निर्माण होतो.
मात्र काँग्रेसच्या दणक्यानंतर यंत्रणेला जाग आली असून तात्काळ या अर्धवट सोडलेल्या कामाला पूर्ण करण्याची लगबग या रस्त्यावरती पाहायला मिळत आहे. हे काम अर्धवट सोडलेले काम पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पूर्ण होणे आवश्यक होते. पावसात हे काम केल्यामुळे त्याच्या दर्जावर निश्चितपणे परिणाम होत असतो. पण आता या कामाला सुरुवात झाल्यामुळे नागरिकांना व विद्यार्थ्यांना दिलासा मिळत आहे. या कामाला सुरवात ही काँग्रेसच्या दणक्यामुळेच झाली असल्याचा दावा काळे यांनी केला आहे.
काळे पुढे म्हणाले की, शहर दुर्दशेचे वास्तव मांडणाऱ्या भकासपर्व पुस्तकाचा हेतूच हा आहे की या माध्यमातून शहराचे लोकप्रतिनिधी आणि विकास करणाऱ्या संबंधित यंत्रणांवर शहर विकासासाठीचा सकारात्मक दबाव निर्माण व्हावा. यातून शहराचा प्रलंबित असणारा विकास व्हावा. शहरात काँग्रेस सत्तेत नसली तरी देखील नागरिकांच्या वतीने एक दबावगट म्हणून काम करत संबंधित यंत्रणांकडून विकास कामे करुन घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका आम्ही बजावत आहोत. ते काँग्रेसचे कर्तव्य आहे. पुढील आठवड्यात ज्या वेळी पुस्तक प्रकाशन होईल, त्यावेळी त्यातून अशाच पद्धतीचा शहर विकासासाठीचा सकारात्मक दबाव हा विकास यंत्रणांवर निर्माण केला जाईल असे काळे यांनी म्हटले आहे.