केंद्रीय योजनांचा लाभ देऊन लाभार्थ्यांना सक्षम करावे- केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल

शिर्डी,दि.२९ (प्रतिनिधी):- केंद्र शासनाच्यावतीने विविध लोकोपयोगी आणि कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभार्थ्यांना लाभ देण्याबरोबरच त्यांना सक्षम करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी आज श्रीरामपूर येथे केले.
१७ सप्टेंबर ते २ आॅकटोबर,२०२२ या दरम्यान सेवा पंधरवडयानिमित्त श्रीरामपूर येथील प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात समाधान योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित केंद्रीय योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार राहूल आहेर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, अहमदनगर महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपविभागीय अधिकारी अनिल पवार, श्रीरामपूरचे तहसिलदार प्रशांत पाटील यावेळी उपस्थित होते.
लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळाल्याने त्यांच्या संधीमधे वाढ होते असे सांगून, मंत्री श्री.पटेल यांनी योजनांची सर्वंकष माहिती प्रशासनाने लाभार्थ्यांना द्यावी असे आवाहन केले. योजनांच्या अंमलबजावणीसाठी येणाऱ्या अडचणींची माहिती मंत्री श्री.पटेल यांनी यावेळी घेतली. सन्मानपत्र देण्यात आलेल्या लाभार्थ्यांशी त्यांनी संवाद साधून त्याचे मनोगत जाणून घेतले.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सेवा पंधरवड्यात नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक असावे असे सांगितले. केंद्रीय योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी तालुका तसेच जिल्हा परिषद गट स्तरावर मेळावे आयोजित करण्याची सूचना केली. केंद्रीय योजनांसाठी निधी कमी पडणार नाही अशी माहिती दिली.
श्रीरामपूर शहर झोपडपट्टीमुक्त व्हावे यासाठी नगर परिषदेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत नियोजन करावे आणि यासंबधी प्रस्ताव सादर करावा असे निर्देश मंत्री श्री.विखे पाटील यांनी यावेळी दिले.
यावेळी प्रातिनिधिक स्वरुपात विविध योजनांच्या लाभार्थ्यांना मंत्री श्री.पटेल आणि मंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडयानिमित्त महसूल, ग्राम विकास, आरोग्य, महिला व बालकल्याण, पशुसंवर्धन, कृषी आणि पोस्ट आदी विभागांच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे आयोजन प्रशासकीय इमारत परिसरात करण्यात आले होते. या प्रदर्शनाला केंद्रीय राज्यमंत्री मंत्री श्री.पटेल यांनी मान्यवरांसोबत भेट देऊन पाहणी केली. यावेळी आयोजकांशी संवाद साधत, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांविषयी त्यांनी माहिती घेतली. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण करण्यात आले.
कृषी विभागाच्यावतीने लाभार्थ्यांना ट्रॅक्टर आणि शेतीसाठी उपयोगी विविध साहित्यांचे मंत्री श्री.पटेल व श्री. विखे पाटील यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला लाभार्थी, पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.