नगर शहराला चित्रपट उद्योग निर्मितीचे केंद्र बनण्यासाठी काम करणार – किरण काळे कोल्हापूर, गोरेगाव फिल्मसिटीच्या धर्तीवर काँग्रेस तयार करणार व्हिजन डॉक्युमेंट

अहमदनगर (प्रतिनिधी) : नगर जिल्हा जशी संतांची भूमी आहे तसेच कलावंतांची देखील पंढरी आहे. मामा तोरडमल, शाहू मोडक, सदाशिव अमरापुरकर यांच्यापासून ते अगदी मिलिंद शिंदे, राजू गटणे यांच्यापर्यंत नव्या पिढीतील देखील अनेक कलावंत नगरच्या मातीने मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. चित्रपट, मालिकांची निर्मिती अलीकडच्या काळात नगर शहरात मोठया प्रमाणावर होत आहे. नगर शहरातील सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित विविध घटकांना व्यावसायिक व रोजगाराच्या संधी मिळण्याच्यादृष्टीने नगर शहराला चित्रपट उद्योग निर्मितीचे केंद्र बनण्यासाठी काम करणार असल्याचे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी प्रतिपादन केले आहे.*
अंतरा प्रोडक्शन, अफसाना ग्रुप, सप्तरंग थिएटरच्या कलावंतांनी वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवल, शॉर्ट फिल्म फेस्टिवल आणि नाट्य स्पर्धांमध्ये संपादित केलेल्या यशाबद्दल काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या
वतीने काळे यांच्या हस्ते सिने, नाट्य कलावंतांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगर काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. बापू चंदनशिवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
काळे म्हणाले की, कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीच जुनं माहेरघर आहे. अनेक जुन्या मराठी चित्रपटांची निर्मिती ही कोल्हापूरच्या भूमीत झाली. बॉलिवूडच केंद्र असणाऱ्या मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटी मध्ये हिंदी, मराठी चित्रपटांची निर्मिती होत असते. मात्र मोठ्या शहरांमध्ये चित्रपट निर्मितीचा खर्च हा अवाढव्य आहे.निर्मात्यांना तो परवडणारा नसतो. नगर शहर हे मुंबईपासून केवळ साडेचार ते पाच तासांच्या अंतरावर आहे. कल्याणमार्गे नगरकडे येणारा रस्ता उत्तम झाला आहे. त्यामुळे मोठे कलावंत, तंत्रज्ञ सुद्धा नगरला येऊन काम करून पुन्हा जाऊ शकतात.
नगर शहरामध्ये कलावंतांना आणि प्रोडक्शन टीमला राहण्यासाठी अल्पदरामध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत. साऊंड, लाईट यासह विविध निगडीत व्यावसायिक, त्याचबरोबर बॅकस्टेज आर्टिस्ट नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असणारे व्यावसायिक व दर्जेदार मोठे इन्फ्रास्ट्रक्चर उभे करण्याची गरज आहे. त्यामुळे कोल्हापूर, गोरेगावच्या धर्तीवर नगर शहरामध्ये चित्रपट उद्योग निर्मितीचे केंद्र निर्माण करण्यासाठी काँग्रेस काम करणार असल्याचे काळे यांनी म्हटले आहे.
प्रा. डॉ. चंदनशिवे म्हणाले की, किरण काळे यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून नगरला चित्रपट उद्योग निर्मितीचे केंद्र बनवण्याच्या दृष्टीने नगरमधील कलावंतांना व सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित विविध घटकांना एकत्रित करत त्यांची मतं विचारात घेऊन व्हिजन डॉक्युमेंट आम्ही तयार करायला घेतले आहे. या माध्यमातून नगर शहराचा सांस्कृतिक चेहरा मोहरा बदलण्याचे काम आगामी काळात काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कलावंत करणार असल्याचे यावेळी चंदनशिवे म्हणाले.
यावेळी सप्तरंग थिएटरच्या आरती अकोलकर, दीपक अकोलकर, गायत्री रोहकले, सागर रोहकले, स्वानंदी भारताल, विद्या रोहकले, अफसाना ग्रुपचे निहाल घोडके, अमोल सुंदूकर,अविनाश चव्हाण, अंतरा प्रोडक्शनचे प्रमोद कसबे, शुभम गाडे, प्रतीक अंथुरे, रोहिणी बनसोड, सौंदर्य भोज, पूजा दुधे, धनश्री वाघ, स्नेहल गटने, प्राची परजने, प्रा. एस.वाय. घाटविसावे, सुहास तरंगे, आदींचा त्यांनी संपादित केलेल्या यशाबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी युवक काँग्रेस ब्लॉक अध्यक्ष प्रवीण गीते पाटील, अभिनय गायकवाड, काँग्रेस महासचिव इम्रान बागवान, शहर जिल्हा सचिव गणेश आपरे, संतोष जाधव, प्रशांत जाधव, सांस्कृतिक विभागाचे कवी दशरथ शिंदे, प्रा. योगेश विलायते, प्रा.रावसाहेब पवार, अविनाश मुदळ, वर्षा पानखडे, अरुण वाघमोडे, भारत सोळसे, प्रशांत शिंदे, गणेश शिंदे, कल्पक मिसाळ, प्रणित अल्हाट, आर डी भनवळ, प्राची परजणे प्रतीक अंधारे माया चंदनशिवे आदींसह, मान्यवर उपस्थित होते.