मराठी पत्रकार परिषदेच्या दक्षिण नगर जिल्हा अध्यक्षपदी सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती

मुंबई : नगर जिल्ह्याचा विस्तार आणि व्याप्ती लक्षात घेऊन संघटनेच्या सोयीसाठी मराठी पत्रकार परिषदेने उत्तर नगर जिल्हा आणि दक्षिण नगर जिल्हा असे दोन भाग केले असून दोन्हीकडे परिषदेच्या स्वतंत्र शाखा स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार दक्षिण नगर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष म्हणून नगरमधील सकाळच्या अग्रोवन या कृषीविषयक दैनिकाचे पत्रकार सूर्यकांत नेटके यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज येथे केली आहे.
सूर्यकांत नेटके यांनी दोन दिवसात आपली कार्यकारिणी निवडून त्यास परिषदेची मान्यता घ्यावी अशी सूचना त्यांना करण्यात आली आहे. नेटके सुमारे २२ वर्षांपासून पत्रकारितेत आहेत. तेव्हापासूनच ते परिषदेशी जोडले गेले आहेत. बीड व नगर जिल्ह्यात त्यांचा मोठा संपर्क आहे. त्यांना पत्रकारितासाठी अनेक सरकारी पुरस्कार मिळाले आहेत.
एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सूरभाई शेख यांनी सूर्यकांत नेटके यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी यापूर्वीच अमोल वैद्य यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कार्यकारिणी जाहीर करून कामालाही सुरवात केली आहे.
आता नगर दक्षिण भागातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव या तालुक्यातील परिषदेचे संघटन मजबूत करण्याची जबाबदारी सूर्यकांत नेटके यांच्यावर सोपविण्यात आली आहे.