कर्जत-जामखेड तालुक्यातील १८ हजारांहून अधिक गरजू लाभार्थ्यांना आ. पवारांच्या हस्ते शिधापत्रिकेचे वाटप!

कर्जत दि. ६ जुलै ( प्रतिनिधी ): आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकातील नागरिकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत शासनाकडून स्वस्त धान्य वितरित केले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून कर्जत व जामखेड मतदारसंघातील अनेक नागरिक पात्र असताना देखील त्यांना विविध कारणांमुळे धान्य मिळत नसल्याचे आ. रोहित पवार यांच्या निदर्शनास आले. आ. पवार यांनी यामध्ये विशेष लक्ष घालत कर्जतचे प्रांताधिकारी, कर्जत आणि जामखेडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व त्यांची सर्व महसूल व ग्रामविकासची यंत्रणा यासह सरपंच, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वस्त धान्य दुकानदार व पुरवठा अधिकारी यांना बरोबर घेऊन रोहितदादांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन बैठका घेतल्या. त्यानंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम-२००३ अंतर्गत लाभार्थी निवडीसाठी विशेष अभियान राबविण्यात आले. निवडण्यात आलेल्या दोन्ही तालुक्यातील १८ हजार ८७५ पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिकेचे वाटप आ रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. कर्जत शहरातील श्रीराम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम बुधवार, दि ६ रोजी संपन्न झाला.
दोन्ही तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, शासकीय अधिकारी, कर्मचारी, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने व आ. रोहित पवार यांच्या कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील मयत झालेल्या व कायमस्वरुपी स्थलांतरित झालेल्या लोकांच्या याद्या बनवून त्यांची नावे कमी करण्याची मोहीम सुरुवातीला तहसील कार्यालयात सुरू झाली. त्यानंतर धान्य दुकानदार, पोलीस पाटील यांच्या मदतीने नवीन लाभार्थी निवड सुरू करण्यात आली. यावेळी संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शी कारभार व्हावा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांना याचा फायदा घेता यावा यासाठी आ. पवार यांनी वेळोवेळी आवश्यक तो पाठपुरावा केला. तसेच तलाठ्यांनीही गावागावात जाऊन बैठका घेतल्या. त्यानंतर कर्जत तालुक्यातील १० हजार ४४८ व जामखेड तालुक्यातील ८ हजार ४२७ अशी एकूण १८ हजार ८७५ गरजू लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. मागच्या वर्षी एकूण १३ हजाराच्या आसपास शिधापत्रिकेचे वाटप करून तो इष्टांक संपविण्यात आला होता. त्या व्यतिरिक्त आता आणखी १८ हजार ८७५ गरजू लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दोन्ही तालुक्यात मिळून एकूण ८३ हजार ५७३ एवढ्या शिधापत्रिका उपलब्ध होत्या व त्याचे लाभार्थी एकुण सव्वा तीन लाखांपेक्षा अधिक आहेत. त्यात आता आणखी भर पडणार असल्याचे दिसून येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येणार असून यापुढे धान्य देखील उपलब्ध होऊ शकणार आहे. तसेच मयत आणि कायमस्वरुपी स्थलांतरित लोकांची नावे काढल्याने आता योग्य आणि पात्र लाभार्थ्यांना लाभ घेण्यास मदत होणार आहे.
*******
मतदारसंघातील कोणीही व्यक्ती शिधापत्रिका मिळण्यापासून वंचित राहू नये असा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. या भावनेतून केलेल्या प्रयत्नांमुळेच एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणात शिधापत्रिका देण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयत्न असावा. त्यासाठी प्रांताधिकारी, तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलिस पाटील, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सर्वांनीच मोठे सहकार्य केले. त्यामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात गरजू नागरिकांना मदत करता आली.
– आ. रोहित पवार