कोल्हारच्या शेतकऱ्याने मागितली मुख्यमंत्र्यांकडे गांजाची शेती करण्याची परवानगी!
समाजमाध्यमातून ठरला चर्चेचा विषय
बाळकृष्ण भोसले
राहुरी / प्रतिनिधी — अहमदनगर जिल्ह्यातील तरुण शेतकरी नानासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल व पोष्टाद्वारे निवेदन पाठवले आहे.
याबाबत माहिती अशी की, नानासाहेब शंकर लोखंडे हे अहमदनगर जिल्हयातल्या राहाता तालुक्यातील तिसगांव येथील रहिवासी असून श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे त्यांच्या आईच्या नावे शेत जमीन आहे. सरकारी आणि नैसर्गिक अनास्थेचा शेतकरी कायमच बळी ठरत आला आहे. पावसाळ्यात शेतातील वीजपंप बंद असतात, हिवाळ्यात रात्री – अपरात्री कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी द्यावे लागते, उन्हाळ्यात बहुतांश जलस्रोतांचे पाणी कमी झालेले असते तर काहींचे पाणी आटलेले असते. अशा गंभीर परिस्थितीत महावितरण कंपनी विज रोहित्र बंद करुन शेतकर्यांचा वारंवार छळ करत असते. हे भयंकर वास्तव आपल्या महाराष्ट्रातील असल्याचे निवेदनात नमूद करत नुकतेच राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी देऊन गोड निर्णय घेतलाय. त्यामुळे जेथे जाऊ तेथे सहज मद्य उपलब्ध होईल.
असाच गोड निर्णय राज्यातील शेतकर्यांसाठी घ्यावा. मी व माझ्यासारखे अनेक शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत. आम्हाला गांजाची लागवड करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यास शासनास ४० टक्के कर देऊ, त्यातून शासनास महसूल मिळेल व शेतकर्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असे लोखंडे यांनी निवेदनात सांगितले आहे. तर ९० दिवसांत परवानगी न मिळाल्यास परवानगी मिळाली आहे. असे गृहीत धरुन गांजाची लागवड करणार असल्याचे लोखंडे यांनी निवेदनात नमुद केले आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह मुख्य सचिव, महसूल मंत्री, महसूल सचिव, जिल्हाधिकारी अहमदनगर व तहसिलदार श्रीरामपूर यांना पाठवल्या आहेत. त्यांचे हे निवेदन सध्या समाजमाध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरले असून राज्य सरकार परवानगी देणार की नाकारणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरले आहे