माती परीक्षण आणि खतांचे योग्य व्यवस्थापन करून कापुस पिकांची उत्पादकता वाढवावी – जिल्हा कृषी अधीक्षक जगताप

कर्जत( प्रतिनिधी) : दि २ जुलै
कापूस पिकांसाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून त्यानुसार खतांचा वापर करावा. यासह एक गाव-एक वाण वापरून कापूस पीक उत्पादनात वाढ करावी आणि आपली उन्नती साधावी असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी केले. ते रवळगांव (ता.कर्जत) येथे कृषी संजीवनी सप्ताह आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक जगताप म्हणाले की, रवळगांवची कापूस पिकांची उत्पादकता अत्यंत कमी असून ती वाढविण्यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस पीक उत्पादकता वाढ आणि मुख्य साखळी विकास योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घेत आपल्या गावाची उत्पादकता वाढ करावी. यासह कृषी संजीवनी कार्यशाळेत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेत एक गाव-एक वाण घेत कापुस पिकांचे योग्य व्यवस्थापन करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन उपस्थित शेतकऱ्यांना केले. यावेळी मंडळ कृषी अधिकारी अमर अडसूळ, कृषी पर्यवेक्षक प्रमोद काळदाते, कृषी सहायक प्रकाश नवले, सरपंच सचिन तनपुरे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.