भाजपाचे आ गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

भाजपाचे आ गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात प्रक्षोभक भाषण केल्याचा कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कर्जत (प्रतिनिधी ): दि १ जून
दोन समाजात द्वेष निर्माण होईल असे प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी भाजपाचे आ गोपीचंद पडळकर यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याविषयी गणेशवाडी (ता.कर्जत) येथील रवींद्र सखाराम पांडुळे यांनी आ पडळकर यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवासाठी चोंडी येथे जात असताना बेनवाडी फाटा आणि चापडगाव येथील चोंडी प्रवेशद्वाराजवळ मंगळवार, दि ३१ रोजी भाजपाचे आ गोपीचंद पडळकर यांनी हजर असलेल्या नागरिकांच्या समक्ष भाषणातून तसेच टीव्ही मीडियावर बोलत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मनात भीती निर्माण होईल तसेच समाज-समाजामध्ये द्वेष निर्माण होईल या हेतूने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कर्जत-जामखेडचे आ रोहित पवार तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी उपस्थित असलेल्या इतर नेते मंडळींवर प्रक्षोभक भाषण आणि विधाने करीत दोन समाज व समूहात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद रवींद्र पांडुळे यांनी दाखल केली आहे. सदर फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आ गोपीचंद पडळकर यांच्यावर ३८३/२०२२ भादवी कलम ५०५ (२) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.