कर्जत तालुक्यात गाळपाविना मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक, रोहित पवार यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये : डॉ सुनील गावडे

कर्जत दि.१३मे (प्रतिनिधी)-जामखेड तालुक्यातील अनेक शेतक-यांचा ऊस आजही शेतात उभा असताना विद्यमान लोकप्रतिनिधी मात्र दोन्ही तालुक्यातील संपुर्ण ऊस गाळप केल्याचे सांगत आहे. असे खोटे बोलून ते ऊस उत्पादक शेतक-यांची दिशाभूल करून त्यांच्या जखमेवर मीठ चोळायचे काम करीत असल्याचा आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष डाॅ सुनील गावडे यांनी केला. याबाबत गावडे यांनी प्रसिद्धीपत्रक काढत आ पवार यांना शिल्लक ऊस प्रश्नी लक्ष्य केले आहे.
कर्जत-जामखेड तालुक्यातील ऊस गाळपाचे नियोजन करून कर्जत तालुक्यातील अंबालिका , जामखेड तालुक्यातील हाळगाव येथील जय श्रीराम आणि बारामती ॲग्रोच्या मार्फत ऊस रिकव्हरीला कमी असतानाही विक्रमी गाळप केल्याचा दावा आ. रोहित पवार यांनी केला आहे. तसेच आ पवार यांनी पाण्याची अडचण असणाऱ्या ठिकाणच्या शेतकऱ्याचा ऊस गाळप केल्याचा दावा केला आहे. मात्र आ पवार यांचा हा दावा साफ खोटा असून, या मतदारसंघात आजही हजारो मेट्रिक टन ऊस गाळपाविना शेतात शिल्लक आहे. ही प्रत्यक्ष वस्तुस्थिती तालुक्यात दिसत आहे. प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्याच्या नादात आ पवार शेतक-यांच्या जिव्हाळयाचा प्रश्र असलेल्या ऊसाच्या प्रश्राची कशाप्रकारे थट्टा करू शकतात हे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दहा दिवसापुर्वी दि ३० एप्रिल रोजी नगर येथील बैठकीत जिल्ह्यात ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याचे जाहिर केले होते. या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील एकटया अंबालिका साखर कारखान्याकडे नोंद असलेला २१ हजार मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक राहिला असल्याची बाब पुढे आली आहे. तर जामखेड तालुक्यातील जय श्रीराम साखर कारखान्याकडे नोंद असलेला ५०० मेट्रिक टन ऊस गाळपाविना शिल्लक असल्याची अधिकृत माहिती प्रादेशिक उपसंचालक साखर कार्यालयाकडून मिळाली. विशेष म्हणजे हे दोन्ही कारखाने नगर जिल्ह्यातील असल्यामुळे याच दोन कारखान्याकडे ज्या शेतक-यांनी आपल्या ऊसाची नोंद केली आहे. फक्त अशाच नोंदीनूसार शिल्लक ऊसाची अधिकृत माहिती या कार्यालयाकडून मिळाली. मात्र कर्जत तालुक्यातील बहुतांश ऊस हा शेजारील श्रीगोंदा, करमाळा, इंदापुर, दौण्ड आणि बारामती तालुक्यातील साखर कारखान्यांना दिला जातो. श्रीगोंदा वगळता उर्वरित सर्व तालुके दुस-या जिल्ह्यात येत असल्याने ही माहिती नगर कार्यालयात उपलब्ध होत नाही. मात्र याठिकाणच्या कारखान्यांनीही कर्जत तालुक्यातील ऊसाची मोठया स्वरूपात नोंद घेतलेली आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात गाळपाविना ५० हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळपाविना शिल्लक असल्याची गंभीर बाब पुढे आली आहे.
जामखेड तालुक्यातील जय श्रीराम साखर कारखान्याने यावर्षीच्या गाळप हंगामात ३ लाख २७ हजार मेट्रिक टन ऊस गाळप केले. मात्र एकुण गाळपापैकी केवळ १ लाख ५९ हजार मेट्रीक टन ऊस जामखेड तालुक्यातील गाळप केला आहे. ऊर्वरित १ लाख ६८ हजार मेट्रिक टन ऊस करमाळा, आष्टी, परांडा या तालुक्यातील गाळप केला आहे. या कारखान्याकडे नोंद असलेला ५०० मेट्रिक टन ऊस आजही शिल्लक असल्याची माहिती प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडू प्राप्त झाली आहे. दरम्यान जामखेड तालुक्यातील बहुतांश ऊस हा करमाळा तालुक्यातील कमलादेवी साखर कारखाना, भैरवनाथ साखर कारखाना विहाळ येथे दिला जातो. या दोन्ही कारखान्याचे गट ऑफीस जामखेड तालुक्यात असून, या दोन्ही कारखान्याकडून दरवर्षी नियमित नोंदी घेत ऊस नेला जातो. मात्र यावर्षी नोंदीचा ऊसही शिल्लक असल्याने शेतक-यांमध्ये संताप आहे. करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे जामखेड तालुक्यातील बारा गावात कार्यक्षेत्र आहे. जवळपास चार हजार सभासद हे या कारखान्याचे सभासद आहेत. मात्र हा कारखाना बंद असल्याने ऊसाचा प्रश्र अधिकच गंभीर बनला असून ऊस घालताना शेतकरी मेटाकुटीला आला आहे. प्रत्येक गोष्टीत श्रेय घेण्यासाठी आ रोहित पवार आणि त्यांची यंत्रणा केविलवाणी प्रयत्न करीत असतात. बहूतांश कामे ते ओढून-ताणून स्वता आपणच करीत असल्याचा कांगावा करून शेतकऱ्याची कशाप्रकारे दिशाभूल करतात हे वरील अधिकृत माहितीतून पुढे येत असल्याचा गंभीर आरोप भाजपाचे तालुकाध्यक्ष डाॅ सुनील गावडे यांनी प्रसिद्धी पत्रकात केला आहे.