कला पथकाच्या माध्यमातून शासनाचे काम गाव- वाड्या- वस्त्यांपर्यत पोहचतयं
गावोगावी मिळतोय सर्वसामान्यांचा उत्तम प्रतिसाद

अहमदनगर, दि.१५ (प्रतिनिधी) अहमदनगर, उत्तर नगर व दक्षिण नगर मधील तालुक्यातील मोठ्या आणि बाजारपेठाच्या गावात लोक कलावंत शासनाचे काम व योजनांचे सादरीकरण शाहिरी, गण गवळण, बतावणी आणि गीताच्या माध्यमांतून करीत आहेत. त्याला गाव-वाड्या-वस्त्यांमध्ये सर्वसामान्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जिल्ह्यात कलापथकांच्या माध्यमातून शासनाच्या कल्याणकारी योजनांची व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. हे कलापथक या शासनाच्या काळात ज्या ज्या लोक कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. ज्यात महिलांच्या विकास योजना, विद्यार्थी शेतकऱ्यांच्या योजना, त्यांच्या भाषेत गाण्यातून, ढोलकीचा ठेका धरून सांगतात. त्याला लोक उत्तम प्रतिसाद देतात.
रसिक कला मंचच्या पथकाने वासुंदा, टाकळी ढोकेश्वर, देहरे, चिंचोडी पाटील, मिरजगाव येथे कार्यक्रम सादर केले. कला साध्य प्रतिष्ठानने शिर्डी, लोणी, निमगांव, समनापूर, तळेगांव, धामोरी, देवठाण येथे आपल्या अनोख्या शैलीत कार्यक्रम सादर केले. जय हिंद लोक कलामंचच्या पदाधिकाऱ्यांनी मिरी, तिसगाव,दहिगांव-नि, भातकुडगांव, पाचेगांव, बारागांव नांदुर, राहूरी बस स्थानक, निमगाव खैरी या गावांमध्ये कार्यक्रम सादर केले.
लोक अगदी बैठक मारून कार्यक्रम ऐकत होते. योजनांची माहिती अत्यंत रंजक व गोष्टी स्वरूपात मिळत असल्याने लोकांवर त्याचा उत्तम परिणाम होत असल्याचे चित्र या कार्यक्रमातून दिसत आहे.
शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात हाच उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने सुरू असलेल्या कलापथकांच्या माध्यमातून योजनांचा जागर कार्यक्रमास ९ मार्चपासून सुरूवात झाली. हा कार्यक्रम १७ मार्च २०२२ पर्यंत सुरू राहणार आहे. तीन कला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात हे कार्यक्रम होत आहेत.