काँग्रेस सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ऋतिक जाधवांची वर्णी!

अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी ऋतिक रवींद्र जाधव यांची वर्णी लागली आहे. माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने व शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या शिफारशीने जाधव यांच्यावर ही जबाबदारी पक्षाच्यावतीने सोपविण्यात आली आहे. प सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले व आ. थोरात यांच्या मान्यतेने ही निवड मुंबईतून जाहीर केली आहे.
खा.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आपल्या सोशल मीडिया विभागाला अधिक बळकट केले असून राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या अध्यक्षांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. लवकरच ही यात्रा महाराष्ट्रात पोहोचणार आहे.जाधव यांनी यापूर्वी नगर शहर युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करीत आहेत युवक काँग्रेसच्या माध्यमातून त्यांनी आजवर युवकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काम केले आहे. आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, वृक्षारोपण कार्यक्रम राबविणे, करिअर मार्गदर्शन कार्यक्रम राबविणे आदी उपक्रम त्यांनी आजवर यशस्वीरित्या राबविले आहेत.
निवडीनंतर जाधव म्हणाले की, जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास शहरात सोशल मीडिया विभागाच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार आणि कार्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवित सार्थ ठरवण्याचे काम मी करणार आहे. शहरातील सोशल मीडिया विभागाच्या यापूर्वीच्या सर्व नियुक्त्या रद्द करण्यात आल्या असून लवकरच नवीन नियुक्त्या करण्यात येतील. ब्लॉक स्तरावर नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात येणार असून विधानसभा अध्यक्ष देखील नव्याने देण्यात येणार आहे. त्याचबरोबर ब्लॉक स्तर, विधानसभा स्तर आणि शहर जिल्हा स्तरावरती कार्यकारणीचे देखील गठन करण्यात येणार आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर यांच्या प्रभावी हाताळणीसाठीचे तांत्रिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जाधव यांच्या निवडीबद्दल सोशल मीडिया विभागाचे प्रदेशाध्यक्ष विशाल मुत्तेमवार, अभिजीत सपकाळ, राज्य समन्वयक ज्ञानेश्वर चव्हाण, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, संगमनेर नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेश प्रतिनिधी डॉ. जयश्रीताई थोरात, महानंदाचे चेअरमन इंद्रजीत देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. मोहन जोशी, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सचिन गुजर, प्रदेश सरचिटणीस सचिन गुंजाळ, प्रदेश सरचिटणीस हेमंत ओगले, प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष आकाश क्षीरसागर आदींनी अभिनंदन केले आहे.