देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर शहर मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देणारा टेक्स्ट मेसेज दोन दिवसा पूर्वी त्यांचे स्वीय सहाय्यक सुहास शिरसाठ यांच्या मोबाईल वर आला होता. या प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या बाबतीत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा कसून शोध घेत हैद्राबाद येथून आरोपीच्या मुसक्या आवळल्याची माहिती समोर आली आहे.
आमदार संग्राम जगताप गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहेत. अजित पवार सातत्याने सर्वधर्म समभाव आणि छत्रपती, शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा घेऊन आपण पुढे जात असल्याचं सांगतात. मात्र, त्यांच्याच पक्षाचे आमदार असलेल्या संग्राम जगताप यांनी हिंदुत्त्ववादी भूमिका घेतल्याचं अनेकदा पाहायला मिळालं. विशेष म्हणजे जाहीरपणे भाषणं करत त्यांनी मुस्लिमांना लक्ष्य केल्याचंही दिसून आलं होतं. तर अजित पवारांनी बोलावलेल्या आमदारांच्या बैठकीतही त्यांनी दांडी मारल्याने संग्राम जगताप यांच्या मनात नेमकं काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळातून समोर येत होता. त्यातच, दोन दिवसांपूर्वी संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. अखेर, धमकी देणाऱ्यास हैदराबाद येथून अटक करण्यात आली आहे, पण आरोपी मूळ बीडचा असल्याचीही माहिती आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा