राजकिय
अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी (अजित पवार ) गट व भाजपची दहशत : अनिल शिंदे

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर. दि. 7 जानेवारी:अहिल्यानगर महानगर पालिका निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. अहिल्यानगर शहरात आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.अहिल्यानगर शहरात राष्ट्रवादी (अजित पवार ) गटाची, व भाजपची दहशत असल्यामुळे त्यांचेच उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यांनी उमेदवारांना अर्ज माघारी घेण्यास भाग पाडले असल्याचा गँभीर आरोप मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा अध्यक्ष अनिल शिंदे यांनी आयोजित पत्रकार परिषदे मध्ये केला. यावेळी बोलतांना ते म्हणाले आम्ही जनतेच्या दारात जाऊन कौल मागणार आहोत. यावेळी विविध प्रभागातील 10 अपक्ष उमेदवारांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. प्रवेश केलेल्या 10 उमेदवारांना यावेळी शिंदे गटाकडून पुरस्कृत करण्यात आले.आता शिवसेना शिंदे गटाकडून 49 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.यावेळी शहरअध्यक्ष सचिन जाधव, संभाजी कदम, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा ऍड. स्वाती ठुबे,रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील शिंदे,आदी उपस्थित होते.
शहर अध्यक्ष सचिन जाधव बोलतांना म्हणाले, अहिल्यानगर शहरात कोणाची दहशत आहे, हे नगरकरांना माहिती आहे. शिवसेना नेहमीच दहशते विरुद्ध व अन्याया विरुद्ध संघर्ष करीत आली आहे.माजी मंत्री, हिंदू धर्मरक्षक स्वर्गीय अनिल भैय्या राठोड यांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये कालही प्रेम होते व आजही आहे. त्यामुळे नगर शहरातील मतदार मत पेटीतून दहशतीला उत्तर देऊन शिवसेना( शिंदे गटाच्या ) उमेदवारांना मोठया प्रमाणात निवडून आणल्या शिवाय राहणार नसल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी बोलतांना संभाजी कदम म्हणाले शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात लाडकी बहीण योजनेमुळे अत्यंत चांगले वातावरण आहे. अहिल्या नगर शहरात एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महापौर शिवसेना शिंदे गटाचा होईल असा दावा त्यांनी यावेळी केला. यावेळी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.



