सामाजिक

कॅनव्हासवर साकारली देवी अहिल्यां देवींची शिवभक्ती आणि १०० वर्षं जुना महाकुंभ दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि महानगरपालिके

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर, २४ सप्टेंबर २०२५
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) आणि अहिल्या नगर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय “आलेख्य” चित्रप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. महावीर कलादालन, अहिल्या नगर येथे या प्रदर्शनाचे भव्य उद्घाटन झाले. हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मत्रिशताब्दी वर्षासह महाकुंभाच्या भव्यतेस अर्पण करण्यात आले आहे.हे प्रदर्शन 26 तारखे पर्यंत असणार आहे.
या प्रदर्शनात देशभरातील नामांकित कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहासाला सजीव आकार देण्यात आला आहे. उद्घाटन समारंभास प्रमुख अतिथी म्हणून अहिल्या नगर महानगरपालिकेचे आयुक्त श्री. यशवंत डांगे आणि उपायुक्त श्री. विजयकुमार मुंडे, गजानन शेळके (विभाग प्रमुख ) , दिपकजी पाटील (वरिष्ठ लेखाधिकारी )उपस्थित होते.
देशभरातील सुमारे २०० कलाकारांपैकी निवडलेल्या ५३ चित्रांचे येथे दर्शन घडत आहे. या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, इतिहास व परंपरेचे विविध पैलू प्रकट होतात. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालिका श्रीमती आस्था कार्लेकर यांनी सांगितले की, कलाकारांनी देवी अहिल्यांची शिवभक्ती, समाजातील स्त्रियांच्या शिक्षणासाठीचे प्रयत्न, सतीप्रथेचा विरोध आणि माहेश्वरी साड्यांच्या हातमागाला प्रोत्साहन अशा विविध विषयांना कॅनव्हासवर प्रभावीपणे साकारले आहे.
ही सर्व कलाकृती रायपूर येथे संस्कार भारतीच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत साकारल्या गेल्या. एका चित्रात देवी अहिल्याबाई घाटावर हातात शिवलिंग धरून उभ्या असल्याचे दर्शन घडते, तर दुसऱ्या चित्रात सतीप्रथेचा विरोध ठळकपणे मांडलेला आहे. तसेच, कुंभमेळ्याच्या कलाग्रामात साधूंची साधना, अपार भक्तांची गर्दी आणि अध्यात्मिक वातावरण या विविध छटा कलाकारांनी आपल्या कलाकृतींमधून सुंदरपणे व्यक्त केल्या आहेत. या चित्रांकडे पाहताना प्रेक्षकांना जणू प्रयागराजच्या कुंभनगरीत उभे असल्याचा अनुभव येतो.
या प्रदर्शनाला कला प्रेमी, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहाने पाहणी केली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे त्यागमय, सेवाभावी व जनकल्याणकारी कार्य तसेच महाकुंभाची अद्वितीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक छटा अनुभवण्याची संधी या प्रदर्शनातून प्रेक्षकांना मिळाली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे