खादानीत बुडालेला तरुणांचा मृतदेह सापडला, ४० तास शोधमोहीमेचे अथक प्रयत्न

कर्जत (प्रतिनिधी) : दि १९ मे
सुपे (ता.कर्जत) येथील खडीच्या खादानीत साथीदारासोबत पोहण्यास गेलेल्या २७ वर्षीय युवकांचा बुडून मृत्यु झाला. तब्बल ४० तास तालुका प्रशासनाच्या अथक प्रयत्नानंतर या युवकांचा मृतदेह गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास हाती लागला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी दुपारी दत्तात्रय झुंबर उबाळे (वय २७, रा.चिंचोली काळदात, ता.कर्जत) हा तरुण अन्य साथीदारासोबत पोहण्यासाठी मौजे सुपे हद्दीतील गट न १७४ मधील खदानीत गेला होता. बऱ्याच वेळ पोहून झाल्यानंतर या टोकापासून त्या टोकापर्यंत पोहून जाण्याची पैंज लागली असता त्याला दम लागल्याने डोहाच्या मध्यभागी तो बुडाला. यावेळी स्थानिक लोकांनी त्याचा शोध घेतला असता मिळून येत नसल्याने प्रशासनाने अहमदनगर आपत्ती व्यवस्थापन यांच्याशी संपर्क करीत शोधमोहीम राबवली. मात्र तरी देखील ठावठिकाणा लागत नसल्याने नाशिक आणि पैठण येथील पाणबुडी पथक यासह स्थानिक पट्टीचे पोहणारे यांचे शोध कार्य सुरू होते. तब्बल ४० तासाच्या अवधीनंतर सदर तरुणांचा मृतदेह गुरुवार, दि १९ रोजी पहाटे ५ वाजता मदतकार्य करणाऱ्याना मिळून आला. तदनंतर शवविच्छेदन करून त्याच्यावर चिंचोली काळदात येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.