नगर शहरात पोलीस आणि माफीयांचे संगनमत – ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे निर्भय बनो सभा – तोफखाना पोलिसांच्या नोटीस नंतर पत्रकार वागळे यांचा आरोप

अहमदनगर दि. 21 फेब्रुवारी (प्रतिनिधी) : नगरला स्वातंत्र्य चळवळीचा मोठा वारसा आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते अच्युतराव पटवर्धन यांच्यासह अनेक महान लोक नगर मध्ये होते. हे मला माहीत होतं. पण आज या शहरात माफिया राजची चर्चा होत आहे. या माफियाराज बद्दल बोलले जात आहे. माफिया राज बद्दल बोलणं गुन्हा आहे का ? असा सवाल करत नगरमध्ये पोलीस आणि माफियाराज यांचे संगनमत असल्याचा थेट आरोप निर्भय बनो सभेला संबोधित करताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी केला.
अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या वतीने माऊली सभागृह येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. लखनऊ व नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. वागळे हॉटेल पॅराडाईज येथून निघण्याच्या तयारीत असतानाच तोफखाना व कोतवाली पोलिसांच्या संयुक्त पथकाने त्यांना नोटीस बजावली. याची माहिती सभेला संबोधित करताना वागळे यांनी नगरकरांना दिली. ते म्हणाले, मी नगरमध्ये येताच पोलिसांनी मला नोटीस देऊन आ.संग्रामभैय्या जगताप यांच्याबाबत बदनामीकारक बोलू नका असे सांगतात. कोण आहेत हे संग्रामभैय्या ? पोलीस या भैय्यांचे हस्तक आहेत का ? असा शब्दात त्यांनी पोलिसांवर हल्ला चढवला.
वागळे म्हणाले, नगर मधील माफिया राज विरुद्ध एकत्रित आवाज नगरकरांनी उठवला पाहिजे. नगरकरांनी गप्प राहू नये. आवश्यकता असल्यास नगर मधील माफिया राज विरोधात मोर्चा काढू. मी पुन्हा येईल. नगरमध्ये पोलीस या माफियांवर कारवाई का करत नाहीत ? इथल्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला केला जातो. पोलिसांसमोरच आरोपीला राजकीय कार्यकर्त्यांकडून पळवून नेले जाते. पोलीस सत्ताधाऱ्यांचे गुलाम झाले आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अयोध्येत भक्ती, धर्माच्या नावाखाली व्यापार :
भाजप सरकारवर यांनी यावेळी जोरदार तोफ डागली. लोकशाहीमध्ये एकाच वेळी रामाची व नथुरामाची भक्ती करता येणार नाही, असे ते म्हणाले. आयोध्येत भक्ती व धर्माच्या नावाखाली व्यापार सुरू असल्याचा आरोप त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला. पानसरे, दाभोळकर, कलबुर्गी यांनी सत्यासाठी बलिदान केले. त्यामुळे नगरकरांनी सत्यासाठी आग्रही राहावे, असे आवाहन यावेळी त्यांनी केले. केंद्र व राज्यातील सरकारला खाली खेचा. लोकशाहीच्या रक्षणासाठी प्रत्येक नागरिकांनी संघर्षाची तयारी ठेवावी. दिल्लीपासून ते गल्लीपर्यंतच्या सत्ताधाऱ्यांना त्यांच्या निर्णयाबद्दल जाब विचारावा, असे ते म्हणाले.
..सभेचे प्रास्ताविक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा लोकशाही बचाव मंचाचे निमंत्रक किरण काळे यांनी केले. प्रास्ताविकापूर्वी संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सूत्रसंचलन मंचाचे समन्वयक प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी केले. सभा यशस्वीतेसाठी अहमदनगर लोकशाही बचाव मंचाच्या स्वयंसेवक, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
नगरकरांची प्रचंड गर्दी :
आयोजकांनी ५.३० वाजता सभा सुरू होण्याची घोषणा केली होती. मात्र ५ वाजल्यापासूनच नगरकर सभास्थळी दाखल होत होते. ५.४५ च्या सुमारास सभागृहातील खुर्च्या भरून गेल्या होत्या. ६ वाजता नगरकरांनी एवढी गर्दी केली की लोक पाऱ्यांवर बसले होते. अनेक लोक उभे होते. शेवटी आयोजकांना सभागृहाच्या बाहेर आयत्यावेळी स्क्रीनची व्यवस्था करावी लागली. तिथे ही लोकांनी गर्दी करत शेवटपर्यंत सभा पाहिली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सभेचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात होते. हजारोच्या संख्येने लोक ही सभा लाईव्ह पाहत होतो. सभेचे आयोजक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रेक्षागृहात नागरिकां समवेत पायऱ्यांवर बसून सभा ऐकली. विशेष म्हणजे व्यासपीठावर वागळे आणि माजी कुलगुरू डॉ. निमसे दोघेच विराजमान होते.
महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्त्यांची उपस्थिती :
सर्वसामान्य नगरकरांचा यावेळी मोठ्या संख्येने उस्फूर्त प्रतिसाद सभेला मिळाला. त्याचबरोबर महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील घटक पक्ष असणारे काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, आम आदमी पार्टी, वंचित बहुजन आघाडी, माकप, भाकप त्याचबरोबर समविचारी संघटना, सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे देखील सभेला उपस्थित होते.
किरण काळेंना पोलिसांची नोटीस :
सभेच्या काही तास आधी तोफखाना पोलीस निरीक्षक कोकरे यांनी किरण काळे यांना नोटीस बजावली. यात अनेक जाचक अटी, शर्ती घालण्यात आल्या. कार्यक्रम वेळी स्वयंसेवक नेमून आयोजकांनी कार्यक्रमासाठी सहभागी झालेल्या प्रेक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे. काही आक्षेपार्ह हालचाली निदर्शनास आल्यास पोलिसांना अवगत करावे. असे त्यात म्हटले होते. यावर काळे यांनी पोलिसांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले पोलीस आणि खाकीचा आम्ही आदर करतो. मात्र राजकीय दबावातून त्यांनी नोटीस दिली आहे. जर आमच्या स्वयंसेवकांनी प्रेक्षकांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचं असेल तर पोलीस कशासाठी आहेत ? वागळे हे प्रक्षोभक भाषण करतात. त्यामुळे समाजात तेढ निर्माण होऊन शांतता भंग, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत खबरदारी घ्यावी.कार्यक्रम वेळी कायदा सुव्यवस्था बिघडेल अशी तैलचित्र, फोटो लावू नयेत. आक्षेपार्ह घोषणा देऊ नये, असे नोटीसध्ये म्हटले होते. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे फोटो लावणे, जय संविधान अशा घोषणा देणे आक्षेपार्ह असू शकत नाही. हे करणे जर कोणाला आक्षेपार्ह वाटत असेल तर आम्ही ते एकदा नाही तर लाख वेळा करु असे काळे जाहीर करत काळे यांनी पोलिसांच्या नोटिसीचा निषेध केला.
लोकशाही बचाव मंचाच्या कार्यकर्त्यांचे वागळे यांना संरक्षण :
पुण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी वागळे यांच्यावर हल्ला केला होता. पोलिसांनी किरण काळे यांना नोटीस बजावत आयोजकांवरच अनेक अटी, शर्ती लादल्या मुळे हॉटेल पॅराडाईज येथून माऊली सभागृह या सभास्थळी निखिल वागळे यांना घेऊन जात असताना काँगेसच्या सुमारे ३००ते ४०० तरुण कार्यकर्त्यांनी वागळे यांना घेऊन जाणाऱ्या इनोवा गाडी भोवती दुचाक्यांचा ताफा लावत त्यांना संरक्षण देत सभास्थळी आणले. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी संरक्षण देण्याचे काम केले.
————————–