केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांना अहमदनगर शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केलेल्या विनवणीच्या ई-मेलद्वारे पाठवलेल्या पत्राचा ड्राफ्ट!

विषय : नगर – कल्याण रोडवरील अहमदनगर शहराजवळील सीना नदीवरील पुलाची उंची वाढवून नवीन फुल उभारणीबाबत….
महोदय,
आमचे ऐतिहासिक नगर शहर सीना नदीच्या काठी वसलेले शहर आहे. मात्र मागील काही कालावधीपासून सतत्च्या अतिवृष्टीमुळे शहरातून जाणाऱ्या नदीला पूर येत आहे. मूळ नदी पात्रामध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमण झाले आहे. पूर नियंत्रण रेषे विषयी प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून आवश्यक ती खबरदारी न घेण्यात आल्यामुळे नदीपात्र हे पूर्वीपेक्षा छोटे झाले आहे. तसेच नगर शहरातील नैसर्गिक प्रवाह असणारे ओढे – नाले महानगरपालिका प्रशासनाच्या आशीर्वादाने, राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधींच्या वरदहस्थातून, आर्थिक संगणमत करीत काही बिल्डर लोकांनी गिळंकृत केल्यामुळे शहरातील पावसाच्या पाण्याच्या निचरा होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये अतिरिक्त चुकीचा मानवी हस्तक्षेप झाल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली आहे.
या व नदीपात्रातील अतिक्रमणाच्या कारणामुळे नदीच्या पाणी सामावून घेण्याच्या क्षमतेत प्रचंड घट झाली आहे. परिणामी यामुळे अनेकदा मध्यम व जास्त प्रमाणात पाऊस झाला की आसपासच्या भागांमध्ये पाणी शिरते. मात्र आता मागील महिनाभरात दोन वेळा नगर – कल्याण राष्ट्रीय महामार्गावरील नगर शहराच्या लगत असणाऱ्या अमरधाम जवळील सीना नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. यामुळे म पुलाच्या पलीकडे नगर शहराचेच नागरिक असणाऱ्या शिवाजीनगर, विद्या कॉलनी सह सर्व भागातील नागरिकांचा शहराशी संपूर्ण संपर्क यामुळे तुटत आहे. परिसरामध्ये दाट लोकवस्ती आहे. या भागातील लोक नोकरी, व्यवसाय आणि इतर खाजगी कामानिमित्त शहरात ये-जा करत असतात त्यांच्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक, लहान मुले असतात. महिलांना सुद्धा या रस्त्याने ये-जा करावी लागते.
मात्र काल दि. २०.१०.२०२२ रोजी हा पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेल्यामुळे सुमारे १२ तासांहून अधिक काळ या परिसरातील स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली होती. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे राज्य आणि देशातून येणाऱ्या वाहनांची देखील मोठी गर्दी या रस्त्यावरून ये-जा करत असते. काल या पुलावर पाणी आल्यामुळे शहराच्या केडगाव बायपास, नगर – औरंगाबाद रोडकडे जाणारा रस्ता, तसेच पाथर्डी, जामखेड, सोलापूरकडे जाणारे मार्ग या सर्व रस्त्यांवर हजारो गाड्यांच्या लांबच लांब रांगा तासंतास रस्त्यावर लागल्या होत्या.
यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड गैरसोयीची, संतापाची भावना दिसत होती. काही ठिकाणी रुग्णवाहिका यामध्ये अडकल्यामुळे रुग्णांची देखील मोठी गैरसोय झाली. नदी पुलावरून एक तरुण वाहून गेल्याची दुर्दैवी घटना देखील समोर आली आहे. नगर शहरातील अंतर्गत रस्ते देखील पूर्णत: उध्वस्त झालेले आहेत. नगर शहरातील बाजारपेठ, शहराच्या विविध भागांमधील मुख्य रस्ते, केडगाव, सावेडी, बोल्हेगाव यासारखे उपनगर भागातील अंतर्गत रस्ते अक्षरशः नामशेष झाले आहेत. यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आणि हवालदिल झालेले आहेत. शरीरातील अंतर्गत असते हा जरी केंद्रीय वाहतूक मंत्रालयाचा विषय नसला तरी देखील स्थानिक शहर लोकप्रतिनिधी व महानगरपालिका यांना रस्ते या प्रश्नाविषयी कोणतीही देणे – घेणे उरलेले नसल्यामुळे याही प्रश्नाकडे मी आपले लक्ष वेधित असून आपण या प्रश्नाकडे देखील नगरकरांची गैरसोय लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक पहावे अशी आपल्याकडून अपेक्षा आहे.
सबब वर नमूद नगर शहराची दयनीय स्थिती पाहता नगर – कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाची उंची वाढवून नवीन पूल करण्यासंदर्भात तातडीने उचित कार्यवाही सुरू करण्यात यावी. तसेच देशाचे जबाबदार मंत्री म्हणून नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी देखील नागरिकांना या समस्येतून मुक्त करण्यासाठी आपण जातीने लक्ष घालावे. अशी मी आपल्याकडे नगरकर जनतेच्या वतीने मागणी तर करतोच. मात्र ” विनवणी ” देखील करतो. कारण की मागणी हा शब्द कदाचित अपुरा वाटू शकतो. परिस्थिती एवढी विदारक आहे की, आता माझ्या नगरकरांसाठी विनवणी करण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्यासमोर उरलेला नाही.
तरी या कामी तात्काळ लक्ष घालत नगरकरांना दिलासा द्यावा ही आपल्याला विनम्र विणवणी.
*आग्रहाचे निमंत्रण :* देशातील रस्ते चांगले व्हावेत यासाठी आपण सातत्याने बोलत असल्याचे आम्ही पाहत असतो. ही खूप चांगली बाब आहे. देश नक्कीच पुढे गेला पाहिजे. पण देश पुढे जात असताना आमचे नगर शहर सुद्धा पुढे गेले पाहिजे. शहरात विकासपर्व अवतरले असल्याचे शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. कदाचित त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते अवतरले असेल ही. मात्र सामान्य नगरकरांच्या आयुष्यात ते अवतरलेले नाही ही शोकांतिका आहे. शहराचा विकास हा व्हायलाच हवा. मात्र विकास होण्याच्याआधी नगर शहरातील अंतर्गत रस्ते विकसित होणे गरजेचे आहे. देशाच्या रस्ते वाहतूक मंत्र्यांना याच देशाच्या नकाशावर असणाऱ्या नगर नावाच्या खेडेरुपी शहरातील अंतर्गत रस्त्यांची नेमकी काय स्थिती आहे हे समजणे आवश्यक आहे. तेव्हा मी आपल्याला काँग्रेसच्या व नगरकर जनतेच्या वतीने नगर शहरातील अंतर्गत रस्त्यांची “रस्ते सहल” घडवू इच्छितो. तसे निमंत्रण आम्ही आपला देत असून आपण या निमंत्रणाचा स्वीकार करावा अशी विनंती आहे. ही सहल चारचाकीतून करणे केवळ अशक्य आहे. आपला सुरक्षेचा ताफा घेऊन सहल करायला निघाल्यास अनंत अडचणी येऊ शकतात. त्यामुळे दुचाकीवरून हा प्रवास आपल्याला करावा लागेल. तो करत असताना आपल्याला मणक्याचे आजार उद्भवू शकतात. या शहरात राहणाऱ्या हजारो नागरिकांना ते उद्भवले आहेत आपण नगर शहरासाठी पाहुणे असणार आहात. आपल्याला तो त्रास होऊ नये यासाठी मोठी खबरदारी घेत आपल्याला शहरातील रस्ते सहल करावी लागेल.