जिल्ह्यात साडेसहा लाख आनंदाच्या शिधा कीट वाटप होणार – महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील रेशन दुकानदारांनी तत्परतेने कीट वाटप करण्याच्या महसूलमंत्र्यांच्या सूचना

शिर्डी दि.४ (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील साडेसहा लाख लाभार्थ्यांना रेशन दुकानांच्या माध्यमातून आनंदाचा शिधा वाटप कीट करण्यात येणार आहे. या योजनेत रेशन दुकानदारांनी पारदर्शकता ठेवत तत्परतेने आनंदाच्या शिधा कीटचे वाटप करावे. अशा सूचना राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे दिल्या.
राहाता मधील खंडोबा चौक येथे आनंदाच्या शिधा कीट वाटपाचा कार्यक्रम महसूलमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, पुरवठा अधिकारी श्री.खरात, रेशन दुकानदार राजू वायकर तसेच स्थानिक पदाधिकारी मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजुरकर, अॅड.रघुनाथ बोठे, नानासाहेब बोठे, कैलास सदाफळ, चंद्रभान म्हेत्रे, सुरेशराव गाडेकर, बाळासाहेब सदाफळ, ज्ञानेश्वर सदाफळ, सागर सदाफळ आदी उपस्थित होते.
महसूलमंत्री श्री.विखे-पाटील म्हणाले, राज्य सरकारच्या माध्यमातून गुढीपाडवा ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनापर्यंत आनंदाचा शिधा वितरित करण्यात येत आहे. फक्त शंभर रूपयात प्रत्येकी एक किलो चणाडाळ, रवा , साखर व पामतेल व वाटपाचा शासनाचा क्रांतीकारी निर्णय आहे.
अहमदनगर जिल्ह्यात ६ लाख ८४ हजार ३०१ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा वाटपाचे काम सुरू आहे. राहाता तालुक्यात ४९ हजार ५७३ लाभार्थ्यांना आनंदाचा शिधा कीट वाटप करण्यात येणार आहे. अशी माहिती ही श्री.विखे-पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी अनिता गाडे, लहआनबआई मेचे, सुंदरा कुऱ्हाडे, वाल्मिकी डांगर, नजमा तांबोळी, संगिता कुऱ्हाडे, सुशिला कुऱ्हाडे, मिना बागुल,रोशनी बागुल व नारायण माळी यांना आनंदाचा शिधा कीटचे महसूलमंत्र्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.