रहेमानिया मस्जिद परिसरात अंतर्गत ड्रेनेजलाईनचे काम सुरू मतदारांच्या सहकार्यामुळेच विकासकामांचा धडाका – नगरसेविका श्रीमती सुनिता कोतकर

नगर दि. 20 डिसेंबर (प्रतिनिधी )- प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका पदावर निवडून दिल्यापासून विकासकामांचा धडाका लावला. पहिल्या टप्प्यात रखडलेले प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न केला. जनतेला निवडणुकीत दिलेल्या शब्द सार्थकी ठरवत असल्याचे समाधान होत आहे, असे प्रतिपादन नगरसेविका सुनीता कोतकर यांनी केले.
रहेमानिया मस्जिद व गणेश खडू कारखाना परिसरातील अंतर्गत ड्रेनेज लाईन कामाच्या शुभारंभप्रसंगी नगरसेविका सुनीता कोतकर बोलत होत्या. श्रीमती कोतकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, सलीम शेख, रियाज शेख, गणेश देशमुख, गौरव कार्ले, प्रेम कोहक, यश वाफारे, शेख फरजाना, शमा सय्यद, समाबाई उरमुडे, सलमा खान, आफरिन सय्यद, हिदायत सय्यद, रोहिणी साठे, आरिफा पठाण, रेश्मा सय्यद, नसीम मोमीन, जयश्री तनपुरे, सुभद्रा वाबळे, वाफारेताई, अनिता पवार, जयबुन्नीसा मोमीन, किरण धस व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
नगरसेविका सुनीता कोतकर पुढे म्हणाल्या की, नियोजित विकासकामांचा आराखडा आम्ही सर्व शिवसेनेच्या प्रभागातील नगरसेवकांनी मिळून बनवला. नियोजित आराखड्याच्या पूर्ततेसाठी महापौर रोहिणीताई शेंडगे यांचे भक्कम पाठबळ लाभले. प्रभागातील मतदारांच्या सहकार्यामुळे व महापौर शेंडगे यांच्या भक्कम पाठबळामुळे प्रभागाचा कायापालट होत असल्याचे एक वेगळेच आत्मिक समाधान मिळत आहे, असे सांगितले.
नगरसेवक अमोल येवले म्हणाले की, आम्ही प्रभागांतील सर्वच नगरसेवक लवकरच नवनवीन विकासकामांचा धडाका लावणार आहोत. जनतेला पायाभूत सुविधा आम्ही देत आहोत. यामध्ये प्रभागातील जनता देखील आम्हाला सहकार्य करत आहे. विकासकामांमुळे जनतेचा समस्यांचा निपटारा अधिक जलद गतीने होत असल्याचे ते म्हणाले. सूत्रसंचालन गौरव कार्ले यांनी केले, तर आभार प्रेम कोहक यांनी मानले.