राजकिय

उद्योजक, व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील – किरण काळे ; काँग्रेसच्या औद्योगिक व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मनसुख संचेतींची वर्णी

अहमदनगर दि. २८ जून (प्रतिनिधी) : व्यापार व उद्योग हे शहर विकासाच्या रथाचे दोन चाकं आहेत. यावर अनेक छोटे-मोठे लघुउद्योजक, व्यापाराशी निगडित घटक, कामगार, कष्टकरी अवलंबून आहेत. नगर शहराला विकसित करायचे असेल तर उद्योग व व्यापाराला चालना मिळण्याची गरज आहे. मात्र या दोन्ही मुख्य घटकांच्या प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी म्हणावे तसे प्रयत्न दुर्दैवाने आजवर झाले नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस सातत्याने प्रयत्नशील असून प्रशासन व शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे.

काँग्रेसच्या औद्योगिक व व्यापार सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी मनसुख संचेती यांची माजी महसूल मंत्री आ.बाळासाहेब थोरातांच्या मान्यतेने व किरण काळेंच्या शिफारशीने सेलचे प्रदेशाध्यक्ष हेमंत सोनारे यांनी निवड केली आहे. तसे नियुक्तीपत्र काळेंच्या हस्ते शासकीय विश्रामगृह येथे आयोजित शहर काँग्रेसच्या बैठकीत प्रदान करण्यात आले. यावेळी काळे बोलत होते. संचेती यापूर्वी ग्रामीण काँग्रेसमध्ये जिल्हा सरचिटणीस होते. ते स्वतः व्यापारी असून गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. संचेती यांच्या माध्यमातून शहरातील व्यापारी, उद्योजकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीच्या प्रयत्नांना बळ मिळेल असा विश्वास यावेळी काळे यांनी व्यक्त केला.

काळे म्हणाले, शहरामध्ये काही मोजक्या कंपन्यांचा अपवाद सोडला तर मोठे उद्योग नाहीत. अनेक कंपन्या एमआयडीसीच्या माध्यमातून त्यांना अपेक्षित असणाऱ्या सोयी सुविधा मिळण्यात येणारा अभाव यामुळे उद्योग विस्तारासाठी उदासीन आहेत. ठराविक लोकांनाच कंपन्यांमध्ये पात्रता नसताना देखील कामे दिली जावीत यासाठी अनावश्यक राजकीय हस्तक्षेप, दबाव असल्याची भावना उद्योजक खाजगीत व्यक्त करत आहेत. ही चिंतेची बाब आहे. आज हजारो कामगार एमआयडीसीवर अवलंबून आहेत.

मात्र त्याहून मोठ्या संख्येने शहरातील युवक रोजगाराच्या संधी अभावी बेरोजगार आहेत. त्यामुळे पुण्या, मुंबईकडे ते स्थलांतरित होत आहेत. अनेकांना त्यांना त्यांच्याकडे असणाऱ्या पात्रतेचा जॉब शहरात मिळत नाही म्हणून स्थलांतर करावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकासआघाडी सरकारच्या काळापासून शहर काँग्रेस सातत्याने प्रयत्न करत आली असल्याचे काळे यावेळी म्हणाले.

शहरातील अशांततेचा बाजारपेठेवर नकारात्मक परिणाम होत असल्याचे मत यावेळी काळे यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, व्यापार सुरळीत चालायचा असेल तर बाजारपेठेत शांतता असायला हवी. शहरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली, हत्याकांड झाले, किरकोळ दगडफेक झाली की याचा व्यापारावर नकारात्मक परिणाम होतो. शहराच्या अन्य भागासह लगतच्या तालुक्यांमधून येणारा ग्राहक काही दिवस बाजारपेठेकडे पाठ फिरवतो. यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे बाजारपेठेत शांतता कायम रहावी यासाठी काँग्रेसचा सातत्याने प्रयत्न असल्याचे काळे म्हणाले.

यावेळी मनपा माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, माजी नगरसेवक संजय झिंजे, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, सचिव रतिलाल भंडारी, उपाध्यक्ष अलतमश जरीवाला, महिला शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, महिला उपाध्यक्ष शैलाताई लांडे, उपाध्यक्ष निजाम जहागीरदार, सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट, विद्यार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, आकाश गायकवाड, युवक सरचिटणीस गौरव घोरपडे, काँग्रेस ग्रंथालय विभाग शहर जिल्हाध्यक्ष सुनील लांडगे, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, काँग्रेस अपंग विभाग शहर समन्वयक सोफियान रंगरेज, सचिव गणेश आपरे, सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, धनंजय देशमुख आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे