सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत अभिषेक कळमकर यांच्या प्रचारासाठी नगरमध्ये जोरदार सभा

नगर शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत अभिषेक कळमकर यांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. या सभेला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
*सभेत उपस्थित नेत्यांची भाषणे :*
*अभिषेक कळमकर:*
“परिवर्तन घडवण्याची ही वेळ आहे. लोकांचे प्रश्न आणि त्रास दूर करण्यासाठी आम्ही लढतोय. लोकांच्या मागे उभा असलेला क्रूर चेहरा आता सगळ्यांना दिसतो आहे. सर्वसामान्यांच्या हातात हात देत, आपण नगर शहराला पुढे न्यायचं आहे. बारामती, चाकण, तळेगाव MIDC कशाच्या आशीर्वादाने पुढे गेल्या हे सर्वांनाच माहित आहे.
हिंजवडीसारखे खरं IT पार्क येत्या दीड वर्षांत नगरमध्ये उभे करायचे आहे. रोहित पवारांनी आश्वासन दिलं आहे की दोन मोठ्या कंपन्या नगरमध्ये येतील. पुण्याला जाऊन काम करणाऱ्या तरुणांनी मला विनंती केली आहे, ‘अभिदादा, काहीतरी करा, पण आम्हाला नगरमध्येच नोकरी मिळावी.’ म्हणून मी सकारात्मक उर्जेने काम करतो आहे. टीका करण्यासाठी नाही, तर नगरच्या विकासासाठी इथे आलो आहे.”
*स्वाती चिटणीस, अँड. हेमाताई पिंगळे:*
“महाराष्ट्रात तुतारीचे वावटळ आहे. खोके सरकारने महिला, शेतकरी, बेरोजगार तरुण यांना वाऱ्यावर सोडले आहे. कपाशी आणि सोयाबीन पिकाला योग्य भाव देण्याचे आश्वासन दिले, परंतु अजूनही शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे मोल मिळाले नाही.”
*दादाभाऊ कळमकर:*
“नगर शहर गुंडगिरी आणि दहशतीच्या विळख्यात सापडले आहे. अभिषेक कळमकर यांना मतदान करून दहशत मुक्त आणि सर्वांगीण विकास साधणारे शहर घडवायचे आहे. गेल्या दहा वर्षांत सत्ताधारी आमदारांनी विकासाच्या नावाखाली फक्त स्वतःचे स्वार्थ साधले.”
*बाळासाहेब बोराटे:*
“सध्याचे आमदार फक्त इव्हेंटबाजी करतात. 3000 कोटींचा निधी नगरला मिळाला, पण तो कुठे गेला? नगर शहराची बिकट अवस्था झाली आहे. अभिषेक कळमकर यांच्या विजयासाठी आपण कामाला लागले पाहिजे.”
*दिलीप सातपुते:*
“देवस्थानांच्या आणि सार्वजनिक जागांवर अतिक्रमण करून त्यांचा गैरवापर केला जातो आहे. शहरात खून आणि गुंडगिरीची मालिका थांबवण्यासाठी अभिषेक कळमकर यांना निवडून देणे गरजेचे आहे.”
*किरण काळे:*
“नगर शहरात सध्या ताबेमारी गँगचे साम्राज्य पसरले आहे. महिलांच्या आणि कुटुंबांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिकांना आपला हक्क मिळवण्यासाठी आवाज उठवावा लागत आहे.”
*सुप्रिया सुळे यांचे भाषण:*
“पाच दशकांपासून दादाभाऊ कळमकर पवार साहेबांसोबत काम करत आहेत. मी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानते की त्यांनी अभिषेकला पाठिंबा दिला आहे. इथल्या परिस्थितीविषयी जे ऐकले, ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. मी कोणत्या शहरात आले आहे, असा प्रश्न मला पडला आहे.
मी शब्द देते, इथून पुढे अहिल्यानगरीत कुणाच्याही दादागिरीला थारा दिला जाणार नाही. पुढील पाच वर्षांमध्ये नगर शहराने असे बदलले पाहिजे की लोक म्हणतील, ‘इथे रयतेचे राज्य आहे.’ अभिषेक, तुला असे काम करायचे आहे. जर कुणीही तुमच्या दारात आंडू पांडू बनून गेला, तर मला फोन करा; त्यांचे काय करायचे ते बघू.
गुलाल उधळल्यानंतर शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला कंबर कसावी लागेल. नगर शहरातील दादागिरी मोडून काढायची आहे. देवाभौंचा मला आदर होता, पण मुख्यमंत्री असताना त्यांची संगत चुकली आणि ते बिघडले. बंदूक दाखवणाऱ्या गृहमंत्र्यांना तुम्ही स्वीकारणार की एक लाख पोलीस भरती करणाऱ्या आर.आर. पाटलांसारख्यांना?
हे सरकार प्रत्येक गोष्टीत पैसे गोळा करते, मग ती दुधाची किंमत असो किंवा शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव. शेतकऱ्याला 30 रुपये आणि शहरातील महिलांना 60 रुपये दुधासाठी द्यावे लागत आहे. हे पैसे जातात कुठे? तर ’50 खोके एकदम ओके’ याच दिशेला. या सरकारने सर्व सामान्यांचे जीवन अशक्य करून ठेवले आहे.”
या सभेमध्ये विशेष गोष्ट घडली ती म्हणजे महाविकास आघाडीच्या व्यासपीठावर भाजपाच्या सोशल मिडिया चे जिल्हाध्यक्ष हर्षद आंगळे यांची उपस्थिती .
नगर शहरातील दहशतीवर हर्षल आंगळे यांची आपबिती
सभेत हर्षल आंगळे, भारतीय जनता पक्षाचे सोशल मीडिया अध्यक्ष, यांनी स्वतःच्या आयुष्यातील कटू अनुभव मांडले.
“समाजसेवा करण्याची इच्छा असूनही, नगर शहरातील दहशतीमुळे ती शक्य होत नाही. मी म्हाडाच्या घरात राहतो, आणि माझ्यावर एकदा हल्ला झाला होता. त्या वेळी पोलिसांकडे गेलो, पण FIR नोंदवण्याऐवजी ‘त्यांना समाज द्या’ असे उत्तर मिळाले.
सध्याची परिस्थिती अशी आहे की, स्वतःच्या घरात राहणे मुश्किल झाले आहे. मुलींना सुरक्षिततेसाठी हॉस्टेलमध्ये ठेवावे लागते, आणि बायको घरी एकटी असताना घरात फटाके फेकले जातात, दहशत निर्माण केली जाते. दहशतीमुळे मला गुंडांकडून सुनावले जाते की, ‘इथे त्रास होतो तर इथे राहता कशाला?’
या परिस्थितीतून नगर शहराला मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन 20 तारखेला अभिषेक कळमकर यांना विजयी करावे, कारण अशा परिस्थितीत विकास होऊ शकत नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
हर्षल आंगळे यांच्या या अनुभवाने सभेत असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. त्यांच्या आपबितीने नगर शहरातील परिस्थिती किती गंभीर आहे, याचा प्रत्यय उपस्थितांना आला.
सुप्रिया सुळे यांनी यावर प्रतिक्रिया देत स्पष्ट केले की, “नगरमध्ये कुणाच्याही दादागिरीला थारा दिला जाणार नाही. अशा गोष्टींसाठी मला थेट फोन करा, आणि या गुंडांना कसे आवरायचे ते आम्ही पाहू.”
दहशतीला उत्तर देण्यासाठी जनतेचा निर्धार
हर्षल आंगळे यांच्या मांडणीमुळे नगर शहराच्या दहशतमुक्त भविष्यासाठी अभिषेक कळमकर यांना विजयी करण्याचा निर्धार जनतेने व्यक्त केला.
सभेच्या शेवटी उपस्थितांनी या सर्व अन्यायाविरोधात एकत्र उभे राहण्याची आणि नगरचे भविष्य घडवण्यासाठी योग्य नेतृत्वाची निवड करण्याची शपथ घेतली.