मयत सफाई कामगारांच्या कुटुंबास १० लाखांची मदत समाजकल्याण कडून तत्परतेने मिळालेल्या मदतीमुळे मयताच्या आईची कृतज्ञतेची भावना

अहमदनगर, दि.०४ मे (प्रतिनिधी)- निंबळक येथे सेप्टीक टँक साफ करतांना मृत्युमुखी पडलेल्या अरूण श्रीधर साठे या सफाई कामगाराचा मृत्यु झाला होता. जिल्हा दक्षता समितीच्या शिफारशीने मयत अरूण साठे यांच्या आई अंजनाबाई श्रीधर साठे यांच्या बँक खात्यात १० लाख रूपयांची मदत वर्ग करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागाने तत्परतेने दिलेल्या मदतीमुळे आई अंजनाबाई यांच्या डोळे पाणावले. शासनाबद्दल त्यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली.
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ या कायद्याने दुषीत गटारामध्ये सफाई करतांना कामगारांचा मृत्यु पावल्यास त्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येते. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या जिल्हा दक्षता समिती मार्फत या प्रकरणांचा आढावा घेण्यात येत असतो. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त या समितीचे सदस्य सचिव असतात. त्यामुळे सफाई कामगारांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनाची जबाबदारी समाज कल्याण विभागाकडे असते.
जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या आदेशान्वये समाज कल्याण सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी मयत अरूण साठे यांच्या कुटुंबाच्या मदतीबाबत तत्परतेने कार्यवाही केली. शासनाकडून निधी प्राप्त करून घेऊन मयत यांची आई अंजनाबाई साठे यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर १० लाख रूपयांची मदत रक्कम वर्ग करण्यात आली. श्री.देवढे यांनी अंजनाबाई यांची त्यांच्या घरी प्रत्यक्ष भेट घेतली असून शासनाच्या मदतीबाबत माहिती दिली.व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावर अंजनाबाई यांनी शासनाकडून तत्परतेने मिळालेल्या मदतीबाबत कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे.