समाज कल्याण अधिकाऱ्यांचा शासकीय वसतिगृहात मुक्काम! विद्यार्थ्यांशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या राज्यातील सर्व वसतिगृहात ‘संवाद’ उपक्रम!

अहमदनगर, दि.२९ जुलै (प्रतिनिधी) – राज्याचे समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी ‘संवाद उपक्रम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व समाज कल्याण अधिकारी आप-आपल्या कार्यक्षेत्रातील शासकीय वसतिगृहात एक रात्र मुक्काम करतील. या मुक्कामात वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी सोयी-सुविधा, समस्या, शैक्षणिक उपक्रमांविषयी मुक्त संवाद साधतील. जिल्ह्यातील शेवगाव येथील मुलांच्या शासकीय वसतिगृहात समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर यांनी २८ जुलै रोजी मुक्काम करत विद्यार्थ्यांशी सहज संवाद साधला. यावेळी अहमदनगर सहाय्यक आयुक्त राधाकिसन देवढे हे उपस्थित होते.
आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी देखील पुणे येथील वसतिग़ृहात मुक्कम करुन स्वतः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत, त्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती जाणून घेतली. ‘संवाद उपक्रमा’चे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून राज्यात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या विभागाचा प्रमुख वसतीगृहात रात्रभर मुक्काम करण्याची घटना घडली आहे. ‘संवाद उपक्रमा’मुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देखील सुखद धक्का बसला आहे.
नाशिक विभागातील समाज कल्याण विभागाचे सर्वच सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांनी त्या-त्या जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात मुक्काम ठोकला आहे. यापुढेही प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे. याबाबत डॉ.प्रशांत नारनवरे यांनी २७ जुलै रोजी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून बैठक घेऊन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
शेवगाव येथील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना नाशिक विभाग प्रादेशिक उपायुक्त डॉ.भगवान वीर यांनी वसतिगृह गृहप्रमुख व गृहपाल यांना वसतीगृहात निवास करणे बाबत सूचना दिल्या. वसतिगृहातील भोजनाचा दर्जा सकस व दर्जेदार ठेवावा. विद्यार्थ्यांचे कक्ष नियमित स्वच्छ करावेत. नियमित आरोग्य तपासणी करावी. संगणक कक्ष व वाचनालय अद्यावत करण्यात यावे.
विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्यात यावे. अशा सूचना श्री.भगवान वीर यांनी यावेळी दिल्या.