भारतीय मानक प्राधिकरणाद्वारे जिल्ह्यातील अधिका-यांसाठी प्रशिक्षण
अहमदनगर, दि. 0८ नोव्हेंबर (प्रतिनिधी) – भारतीय मानक प्राधिकरण, पुणे यांच्या वतीने जिल्ह्यातील शासकीय अधिकारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येथील पंडित जवाहरलाल नेहरु सभागृहात जनजागृती अंतर्गत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. पंकज जावळे, भारतीय मानक प्राधिकरण पुणे शाखेचे उपसंचालक प्राज्योत दहिकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील उपस्थित होते.
प्रशासनातील अधिका-यांनी शासकीय निधीतून खरेदी करतांना आय. एस. आय. प्रमाणित वस्तूंची खरेदी करणे आवश्यक आहे. यासंदर्भात भारतीय मानक प्राधिकारणाच्या वेबसाईट आणि त्यांनी तयार केलेल्या अॅप्सबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने प्रशिक्षणात प्रात्याक्षिकासह माहिती देण्यात आली.
भारत सरकार व भारतीय मानक प्राधिकारण यांच्याद्वारे जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांना नेहमी आवश्यक असणा-या विविध वस्तूंची खरेदी करावी लागते. अशा प्रकारच्या खरेदीसाठी भारतीय मानक प्राधिकरणाद्वारे सर्वत्र जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणुन प्रशिक्षण सत्राचे पुणे कार्यालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. राज्यातील पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर या जिल्ह्यात असे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येणार आहे.