
राहुरी दि.१३(प्रतिनिधी),
राहुरी तालूक्यातील तांभेरे येथे निळा झेंडा लावत असताना पोलिस प्रशासनाने २३ महिला व १२ पुरूष कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. ऐन आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रकरणाला पूढे कोणते वळण लागणार. हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे
राहुरी तालूक्यातील तांभेरे येथे निळा झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन समाजात वाद निर्माण झाले होते. स्थानिक गावकऱ्यांनी पाच दिवस गाव बंद ठेवले होते. तहसीलदार फसिओद्दीन शेख, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, आरपीआय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात व तालूकाध्यक्ष विलास साळवे यांनी मध्यस्थी करून निळा झेंडा दुसर्या ठिकाणी लावून त्या वादावर पडदा टाकला होता. परंतू काही दिवसांपूर्वी भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष तानसेन बिवाल यांच्या नेतृत्वाखाली राहुरी पोलिस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. निळा झेंडा होता त्याच ठिकाणी लावण्यात यावा अशी मागणी भिम आर्मीच्या वतीने करण्यात आली होती.
त्यानंतर सदर प्रकरण काही दिवस शांत झाले होते. मात्र आज दिनांक १२ एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास तांभेरे येथील काही महिला पुरूष मंडळींनी पुर्ववत निळा झेंडा होता त्या ठिकाणी लावला. सदर बातमी पोलिस प्रशासनाला मिळाली. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे, पोलिस उपनिरीक्षक निरज बोकील तसेच सहाय्यक फौजदार महादेव शिंदे, हवालदार ज्ञानदेव गर्जे, साईनाथ टेमकर, आदजिनाथ पाखरे, सोमनाथ जायभाय, रमेश शिंदे, नदिम शेख, राजेंद्र डोळस, दादासाहेब रोहकले, शेषराव कुटे, रामनाथ सानप, गणेश सानप, जानकिराम खेमनर, वाल्मिक पारधी, महिला पोलिस राधिका कोहकडे, मंजुश्री गुंजाळ, मिना नाचन चालक उत्तरेश्वर मोराळे, लक्ष्मण बोडखे आदि पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. यावेळी पोलिस पथकाने सुमारे २३ महिला व १२ पुरूष असे एकूण ३५ जणांना ताब्यात घेतले. यावेळी काही महिला पोलिस गाडीला आडव्या झाल्या होत्या. त्यांनी घोषणाबाजी केली. तर इतर कार्यकर्त्यांची धरपकड पोलिस पथकाकडून चालू होती. जमावाकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. या घटने बाबत संध्याकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.