मांडवी नदीवर भक्कम पूल उभारला जाणार – राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
३ कोटी ६३ लाखांचा निधी मंजूर

अहमदनगर, दि.10 (प्रतिनिधी) – मांडवी येथील वृध्दानदी वरील रस्त्याची वर्दळ लक्षात घेता पुन्हा या नदीला कितीही पूर आला तरी पुरामुळे वाहतूक ठप्प होण्याची वेळ येणार नाही. असा भक्कम स्वरूपाचा प्रदीर्घकाळ टिकणारा पूल या ठिकाणी उभारला जाणार आहे. यासाठी ३ कोटी ६३ लाख रूपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर केला करण्यात आला आहे. अशी माहिती आदिवासी विकास, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी येथे दिली.
पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथील वृद्धा नदीवर ३ कोटी ६३ लाख रुपये खर्चाच्या नवीन पुलाच्या कामाचे भूमिपूजन राज्यमंत्री श्री.तनपुरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी सरपंच राजेंद्र लवांडे, उपसरपंच गणेश शिंदे, राजेंद्र म्हस्के,अनिल रांधवणे, सरपंच सुधाकर वाढेकर, रवींद्र मुळे, शिवाजी मचे, इलियास शेख, महेश लवांडे, पंकज मगर, रमेश लवांडे, म्हातारदेव शिंदे, प्रवीण चव्हाण, सचिन राठोड, गजानन देशमुख, रामदास लवांडे, सुनील लवांडे, प्रताप कराड, राजेंद्र लवांडे, भिमराज लवांडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. राज्यमंत्री श्री.तनपुरे म्हणाले, अहमदनगर पासून पुढे जेऊर, कोल्हारघाट, चिचोंडी, राघूहिवरे, मांडवे, तिसगाव हा अतिशय महत्त्वाचा आणि रहदारीचा रस्ता असून या रस्त्यावरील वृद्धा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक वेळा या रस्त्यावरील वाहतूक बंद करावी लागली आहे. तेव्हा यासाठी नवीन भक्कम पूल आता होणार आहे.
वृद्धा नदीवर पूल बांधण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल मांडवे गावचे सरपंच राजेंद्र लवांडे यांनी ग्रामस्थांच्या वतीने मंत्री श्री.तनपुरे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याहस्ते पाथर्डी तालुक्यातील लोहसर येथे वैजूबाभळगाव रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण व लोहसर, खांडगाव, पवळवाडी येथे जनता दरबार घेऊन येथील ग्रामस्थांच्या विविध प्रश्नांचा यावेळी तालुक्यातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निपटारा केला. जनता दरबाराच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या प्रत्येक प्रश्नांची सोडवणूक केली जाईल. असा विश्वास ही राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केला.