अहो आयुक्त साहेब, रस्ता देता का रस्ता म्हणत बोल्हेगाव रस्ता तातडीने करण्याची काँग्रेसची मागणी ; नगरसेवक गायब झाले असून रस्ते ही गायब झाले आहेत – आकाश आल्हाट

अहमदनगर दि. ९ मे (प्रतिनिधी) : बोल्हेगाव परिसरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. प्रभाग ७ व ८ च्या हद्दीत असणारा कै. काकासाहेब म्हस्के कॉलेज कमान ते हनुमान चौक रस्ता अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न पडला आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या वतीने आयुक्तांना निवेदन देत रस्ते देता का रस्ते, असे म्हणत तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. दोन्ही प्रभागातील नगरसेवक गायब झाले असून रस्ते देखील गायब झाले आहेत, असा आरोप युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट यांनी यावेळी बोलताना केला आहे.
आल्हाट यांच्या पुढाकारातून बोल्हेगावातील नागरिकांनी रस्त्याच्या मागणीसाठी मनपा उपायुक्त सचिन बांगर यांची भेट घेतली आहे. यावेळी मनोज गुंदेचा, दशरथ शिंदे, संजय झिंजे, अनिस चुडीवाला, प्रवीण गीते, आनंद जवंजाळ, प्रणव मकासरे, अभिनय गायकवाड, अलतमश जरीवाला, हाफिज सय्यद, इंजि. सुजित क्षेत्रे, मनसुख संचेती, विलास उबाळे, सुनील भिंगारदिवे, गणेश आपरे, उषाताई भगत, शैलाताई लांडे, हर्षल उजागरे, आकाश पाटोळे, राजू क्षेत्रे, समीर शेख, आकाश जवंजाळ, अक्षय साळवे, वैभव दिवटे, कुणाल उजागरे, सुमित चव्हाण, राकेश पवार, सुरेश बोडके, सुरेखा उजागरे, काजल अल्हाट, छाया आल्हाट, कमल हिवाळे, आशा सोनवणे, शितल क्षेत्रे, शामल साळवे, वैशाली रणसिंग, सुरेखा पवार आदींसह कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किरण काळे म्हणाले की, महापालिका नागरिकांना रस्ते सुद्धा देऊ शकत नाही. सर्व यंत्रणा कोलमडली आहे. मनपा बांधकाम विभागात मोठा भ्रष्टाचार झाला आहे. जनतेच्या पैशांची लूट सुरू आहे. नगरकरांना प्रचंड यातना सोसाव्या लागत आहेत. मनपामध्ये जनहिताची कामे करणाऱ्या पक्षाची आणि स्वच्छ प्रतिमेच्या नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेस यासाठी मैदानात उतरली आहे.
आल्हाट म्हणाले की, सदर रस्ता हा अनेक दिवसांपासून प्रलंबित असून मनपा प्रशासन, मनपा पदाधिकारी स्थानिक नगरसेवक यांचे याकडे नागरिकांची मागणी असून देखील दुर्लक्ष झालेले दिसत आहे. मागील वर्षाच्या पावसाळ्यात या रस्त्याच्या लगत राहणाऱ्या आणि या रस्त्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, चौभे कॉलनी, गांधीनगर रोडसह सर्व कॉलन्यांमधील नागरिकांना जाणे येणे मुश्किल झाले होते. अनेक अपघात देखील या रस्त्यावरील खड्ड्यामुळे सातत्याने होत असतात. आता पावसाळा येऊ घातला आहे. जर त्यापूर्वी या रस्त्याचे काम झाले नाही तर याही वर्षी नागरिकांना जीव मुठीत धरून या रस्त्याने ये – जा करावी लागणार आहेत.
नागरिक महानगरपालिकेचा कर भरतात. जर मनपा हा रस्ता करणार नसेल तर मनपा प्रशासनाला या भागातील नागरिकांकडून कर घेण्याचा नैतिक अधिकार आहे काय ? संतप्त सवाल आल्हाट यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे रस्त्याची गंभीर स्थीती लक्षात घेता व नागरिकांची होणारी अतोनात गैरसोय पाहता तात्काळ या रस्त्याच्या कामास मंजुरी देऊन कामाला सुरुवात करण्यात यावी, अशी मागणी शहर काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे.